जबड्याच्या सांध्यातील गुंतागुंतीच्या ट्युमर शस्त्रक्रियेतून 21 वर्षीय काश्मिरी रूग्णाची सुटका 

img-20180707-wa0001961933277.jpg
Share this News:
पुणे :
जम्मू-काश्मीरमधील 21 वर्षीय रुग्ण मुलीच्या जबड्याच्या सांध्यातील ट्युमरवरील दुर्मिळ, अवघड शस्त्रक्रिया पुण्यातील ‘एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’मध्ये यशस्वीरित्या पार पडली.

डॉ. जे.बी.गार्डे (एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेसच्या ‘ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशिअल’ चे विभाग प्रमुख) यांनी दिनांक 9 जुलै रोजी सलग सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आज ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे रिपोर्ट आले.
या दुर्मिळ शस्त्रक्रियेमध्ये डॉ. जे.बी.गार्डे यांना डॉ.हर्षल भागवत, डॉ. गौरव खुटवड, डॉ.मनिषा बिजलानी, रंगूनवाला डेंटल सायन्सेस महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, डॉ.परवेझ इनामदार (व्यवस्थापकिय संचालक, इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ.रमणदीप दुग्गल (प्राचार्य, एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस), आर.ए.शेख ( रजिस्ट्रार ) यांनी ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यासाठी डॉक्टर चमूला प्रोत्साहन दिले. डॉ.जे.बी.गार्डे यांनी ही शस्त्रक्रिया विना मानधन केली.

‘रूग्णाचा उजव्या बाजूचा जबडा हा ट्युमरमुळे मोठा झाला होता. रुग्णाच्या जबड्याच्या सांध्यात (Temporomandibular Joint) मध्ये ट्युमर झाला होता. ही सांध्यामध्ये झालेली गाठ काढण्यात आली व कॉस्मॅटिक सर्जरी करुन वाढलेले खालच्या जबड्याचे हाड कमी केले गेले’, असे डॉ. जे. बी. गार्डे यांनी सांगितले.
‘ यास्मिन शेख ही मूळची जम्मू-काश्मीर येथील सीमेवर उरी सेक्टर भागात भारतीय लष्कराच्याजवळ राहणारी 21 वर्षीय मुलगी आहे. वयाच्या 15 व्या वर्षी तिचा चेहरा जबड्यामुळे वाकडा होत असल्याचे लक्षात आले. जम्मू-काश्मीर, श्रीनगर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेस प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु जम्मू- काश्मीरमधील ‘असीम फाऊंडेशन’ या काश्मीरमध्ये शैक्षणिक, सामाजिक, रोजगार निर्मितीचे काम करणार्‍या पुण्यातील तरुणांच्या संघटनेच्या बेकरीत काम करणार्‍या यास्मिनला न्याय मिळवून देण्याचे संघटनेने ठरवले. संस्थेचे काम करणार्‍या पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. संजय करवडे आणि ऑर्थोपेडिक डॉ. मिलिंद मोडक यांना याबाबत कळवले. या दोघांनी डॉ.जे.बी.गार्डे यांना रुग्ण समस्येबाबत माहिती देताच डॉक्टरांनी या दुर्मिळ शस्त्रक्रियेस होकार दिला. त्यामुळे आमच्या मुलीस नवीन जीवन मिळाले’, अशी माहिती यास्मिनच्या पालकांनी दिली.
यामध्ये ‘असीम फाऊंडेशन’च्या निरूता किल्लेदार आणि सई बर्वे यांनी खूप सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.