नाशिकफाटा ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरणास आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच मान्यता – दिलीप मोहिते
पिंपरी, 15 डिसेंबर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण या 29.93 कि.मी. लांबीच्या 1013.78 कोटी रकमेच्या कामास मान्यता मिळविण्यासाठी आमदार महेश लांडगे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महामार्गाच्या सहापदरीकरणास मान्यता मिळाली असल्याचे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण या 29.93 कि.मी. लांबीच्या 1013.78 कोटी रकमेच्या कामास मान्यता मिळाली आहे. परंतु, महामार्गाच्या सहापदरीकरणास माझ्यामुळेच परवानगी मिळाल्याचा दावा खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार महेश लांडगे करत आहेत. त्या दोघांमध्ये त्यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे.
याबाबत विचारले असता खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, आमदार महेश लांडगे गेल्या तीन ते चार वर्षांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण व्हावा, यासाठी पाठपुराव करत होतो. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठका घेतल्या. पालकमंत्री गिरीश बापट यांनी आमदार महेश लांडगे यांना मोठे सहकार्य केले.
दोघांनी मिळून वारंवार पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण या 29.93 कि.मी. लांबीच्या 1013.78 कोटी रकमेच्या कामास नितीन गडकरी यांनी मान्यता दिली. महेश लांडगे यांनी भोसरी मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. महेश लांडगे चांगले काम करत आहेत, असेही मोहिते पाटील म्हणाले.
