पुण्यातील सुप्रसिध्द हॉटेल “मॉर्डन कॅफे”च्या भटारखान्यात आग

पुणे – कमला मिल फायरची घटना ताजी असताना आज दुपारी एकच्या सुमारास पुण्याच्या शिवाजीनगर भागातील सुप्रसिध्द असणारे हॉटेल मॉर्डन कॅफेच्या भटारखान्यातील चिमणीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाची सतर्कता तसेच हॉटेलचे कर्मचारी व ग्राहक यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही इजा झाली नसल्याने अनर्थ टळला.
दुपारी एकच्या सुमारास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे हॉटेल मॉर्डन कॅफेमधे आग लागल्याची वर्दि मिळाली. कमला मिलच्या आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून कसबा अग्निशमन केंद्रातील फायरगाडी व एक वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आला व वरिष्ठांना याबाबत त्वरीत कळविण्यात आले. कसबा अग्निशमन केंद्राचे जवान पोहचताच भटारखान्यातील चिमणीने पेट घेतल्याचे लक्षात आले. प्रथम त्यांनी भटारखान्यातील पाच ते सहा सिलेंडर तातडीने बाहेर काढून आगीवर पाणी मारत ; आग अवघ्या दहा मिनिटात आटोक्यात आणली व कोणी जखमी वा अडकले नसल्याची खात्री करत काम पुर्ण केले.
ऩुकतीच मुंबई येथील कमला मिल आगीची घटना व त्यामधे निलंबित झालेल अधिकारी तसेच कालपासून अनधिकृत बांधकामांवर केलेली कारवाई पाहता पुण्यामधे वर्षाच्या शेवटच्या दिवशी अशा सुप्रसिद्ध हॉटेलमधे घडणारी घटना नेमके कशाचे प्रतिक समजावे हे कोडेच म्हटलेले बरे ! पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी कमला मिल आगीच्या धर्तीवर दिलेले कारवाईचे आदेश कितपत धग धरतील व मुंबईसारखी झटपट कारवाई नवीन वर्षाच्या स्वागताला पुण्यनगरीत होईल का ? असा प्रश्नार्थक विचार सुज्ञ पुणेकरांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
सदर कामगिरीमधे कसबा अग्निशमन केंद्राचे अधिकारी रविंद्र आढाव , चालक गोरख गव्हाणे , तांडेल प्रकाश जाधव, अनिल करडे व जवान हरिश बुंदेले, समीर दळवी, निलेश कर्णे, योगेश पिसाळ, अतुल खोपडे यांनी सहभाग घेतला.
