महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र दि. 11 व 12 रोजी सुरु राहणार

Share this News:

पुणे, दि. 09: थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. 11 व 12 नोव्हेंबरला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.

पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणची ‘शून्य थकबाकी’ मोहीम वेगात सुरु आहे. या वीजबिलांचा भरणा न केल्यास थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी दि. 11 व दि. 12 रोजी सार्वजनिक सुटी असली तरी पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

याशिवाय चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्गांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.