विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे!
मुंबई- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना साकडे घालण्यात आले.
आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे विद्यापीठातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधानभवनमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी शिक्षणमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे ‘पासिंग’ पूर्वीप्रमाणे ५० ऐवजी ४० गुणांवर करावे. वास्तविक, राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये 40 गुणांना पासची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पुन:गुणांकन, पुन:मुल्यांकन आणि पेपरी नकल उपलब्ध करण्यासाठी लागणारे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे असावे. पुन:गुणांकणाबाबतचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे. विशेष म्हणजे, विद्यापीठ प्रशासनाकडून पेपर तपासणीबाबत वारंवार हलगर्जीपणा होत आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात यावी. आगामी शैक्षणिक वर्षासाठी लागू करण्यात येणारा ७०/३० हा पॅटर्न सध्या सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री तावडे यांना देण्यात आले आहे.
याबाबत शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, पुणे विद्यापीठातील विधी शाखेतील विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येणार आहे. तसेच, आगामी काळात विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा आणि शैक्षणिक मदत सक्षमपणे केली जाईल, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिका-यांना देण्यात येतील.
