CM Fadnavis drives bullock cart

Share this News:

पिंपरी- राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तमाम बैलगाडा मालक आणि शौकिनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची बैलगाड्यातून छोटी मिरवणुकही काढण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोसरीमध्ये आले होते. कै. अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये त्यानिमित्त समारंभाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल होण्यासाठी आल्यानंतर राज्यातील बैलगाडा मालकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना बैलगाडातून काहीअंतर मिरवणूक करण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर काहीअंत मुख्यमंत्री बैलगाड्यात बसून सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यत आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बैलगाड्याचे ‘सारथी’ म्हणून आमदार महेश लांडगे यांनी ‘कासरा’ हातात धरला. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तामीळनाडू येथील जलकट्टी स्पर्धेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करीत राज्यातील बैलगाडा मालकांनी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीपर्यंत लढा दिला. भारतीय जनता पक्षाने शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या पाठपुराव्याला गती मिळाली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही बैलगाडा मालकांच्या मागण्यांचा सकारात्मक पाठिंबा दिला. त्यामुळे अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात आली. आता लवकरच राज्य सरकार त्याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे. त्यामुळे भाजप सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आभार मानण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेच्या पदाधिका-यांनी बैलगाडातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्याचे ठरवले होते, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांनी दिली.
————
भाजपमुळेच शेतक-यांना न्याय…
राज्यातील शेतक-यांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेला बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सकारात्मक भूमिकेमुळेच झाला झाला. शेतक-यांच्या या लढ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी कायम सकारात्मक पाठबळ दिले. शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी भाजप सरकार अनुकूल भूमिका घेत आहे, असे मत यावेळी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.