‘एक सत्य’ चित्रपटाचा मुहूर्त

Share this News:

आपल्या अंतरंगातल्या गोष्टींचा वेध घेत जगण्याच्या संवेदना उलगडून दाखवणाऱ्या एक सत्य या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील एका गीताच्या चित्रीकरणाने संपन्न झाला. ‘निर्झरा एन्टरटेंन्मेंट ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश गंगणे यांनी केले असून लेखन डॉ. दिनेश काळे यांचे आहे.

मंदार चोळकर लिखित जरा जरा अबोल तू या प्रणयगीताचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतल्या चित्रनगरीत पार पडले. डॉ. दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर या तिघांवर हे गीत चित्रीत झाले आहे. भगवंत नार्वेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला वैशाली सामंत व ऋषिकेश रानडे यांचा स्वरसाज लाभला आहे. या चित्रपटाची कथा तसेच हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर, स्वप्नील राजशेखर यांच्यासह डॉ.दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर आदि कलावंताच्या या चित्रपटात भूमिका आहेत. ‘एक सत्य हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.