‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटासाठी सुरेश आणि भक्ती तिसऱ्यांदा एकत्र

Share this News:

एखाद्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर काही कलाकारांच एकमेकांशी चांगलंच ट्युनिंग जमतं. या ट्युनिंगमुळे एकत्र काम करण्याची संधी सुद्धा या कलाकारांना उपलब्ध होत असते. ‘सैराट’ फेम अभिनेता सुरेश विश्वकर्मा व अभिनेत्री भक्ती चव्हाण यांच्याबाबतीत सुद्धा हा योग जुळून आला आहे. जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन यांची प्रस्तुती असलेल्यातुला पण बाशिंग बांधायचंय या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. फॅँड्रीआणिसैराटया सिनेमात एकत्रित काम केल्यानंतर तुला पण बाशिंग बांधायचंय या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक भानुदास व्यवहारे यांनी या दोघांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे या तीनही चित्रपटात सुरेश विश्वकर्मा हे पाटलाच्या भूमिकेत असून भक्ती चव्हाण यांनी त्यांच्या बायकोची म्हणजे पाटलीणीची भूमिका साकारली आहे. येत्या ३० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपल्या या ट्युनिंगबद्दल बोलताना सुरेश विश्वकर्मा सांगतात की, ‘आम्ही दोघांनी फॅँड्री सिनेमापासून एकत्र काम केलं. या चित्रपटावेळी आमची जुजबी ओळख होती. त्यानंतर सैराटच्या वेळी आमचं ट्युनिंग चांगलंच जमलं. तुला पण बाशिंग बांधायचंय या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिग्दर्शकाला आम्हाला वेगळं काही सांगावं लागलं नाही इतकं आमचं गिव्ह अँड टेक चांगलं होतं. एकत्र काम केल्यानंतर हे ट्युनिंग सहज जुळू शकतं.तुला पण बाशिंग बांधायचंय या चित्रपटात प्रेक्षकांना याची झलक निश्चित दिसेल. लग्नासारखी महत्त्वाच्या गोष्टी ठरवताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा व कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे या चित्रपटात प्रामुख्याने दाखवले असून आजच्या बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल असा विश्वास सुरेश विश्वकर्मा व्यक्त करतात.

या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनीच सांभाळली आहे. या दोघांसोबत या चित्रपटात विक्रम गोखले, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, श्वेता खरात, सुवर्णा काळे,रितेश नगराले, राहुल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण,औदुंबर व्यवहारे यांचे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,संवाद भानुदास व्यवहारे यांचे आहेत.

तुला पण बाशिंग बांधायचंय ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.