भाजपा सरकारकडून दुष्काळाचे राजकारण
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानपरिषदेत अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतील फक्त काही गावांसाठी दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र सदनाच्या पहिल्याच दिवशी दुष्काळग्रस्तांना काहीतरी दिल्यासारखे करुन सरकार दुष्काळाचे राजकारण करत आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे य़ांनी केला आहे. चार महिन्यांपूर्वीच राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती. यावरून पुन्हा एकदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्याप्रती सरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून आले असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तत्पूर्वी, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानपरिषदेत डॉ. भवरलाल जैन यांचा शोक प्रस्ताव आणला गेला. जैन यांच्या शोकप्रस्तावावर श्रद्धांजली व्यक्त करत असतानाच वर्षभरात कर्जबाजारी, नापिकी आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे राज्यात ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याचे स्मरण मुंडे यांनी करुन दिले. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्याप्रतीही परिषदेमध्ये शोकप्रस्ताव व्यक्त करावा, अशी मागणी मुंडे यांनी विधानपरिषदेत केली.