महात्मा फुले समता पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान…
जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय शक्तिशाली भारत निर्माण होवू शकत नाही-डॉ.अरुंधती रॉय
या देशाला जातीधर्माच्या यादवीतुन महात्मा फुलेंचे विचारच वाचवू शकतात…..छगन भुजबळ
पुणे,दि.२८ नोव्हेंबर:- ज्या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा विचार दिला त्याच विचारांवर जगभरातील इतर देशांनी या विचारांचा पुरस्कार केला आहे. मात्र, केवळ त्यांची स्मारके उभारून आम्ही खरे कैवारी असल्याचे भासवून वेगवेगळ्या कुटनीतीने स्वातंत्र्याचा आणि समतेचा विचार संपवण्याचे कारस्थान सुरु असून आगामी काळात यामुळे वैचारिक अराजकता येणार असल्याची भीती प्रसिद्ध लेखिका डॉ.अरुंधती रॉय यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी समता पुरस्कार स्विकारतांना त्या बोलत होत्या. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान कण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, आ.जयदेव गायकवाड, आ. रामराव वडकुते आ.दीप्ती चौधरी, आ.पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आ.जयवंत जाधव, समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, पुणे स्थायी समिती सभापती अश्विनी कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलतांना रॉय पुढे म्हणाल्या की,विद्यमान नेत्यांकडून सांगण्यात येत आहे की,भारत ही महाशक्ती आहे या महाशक्तीत ८ कोटी लोक दररोज २० रुपयांपेक्षा कमी रोजगारावर जगतात.दर सोळाव्या मिनिटाला एक गैर दलितांवर अत्याचार होतो. चारपेक्षा अधिक अस्पृश्य महिलांवर स्पृश्यांकडून बलात्कार करण्यात येतो. दर आठवड्याला तेरा दलितांची हत्या होते आणि सहा दलितांचे अपहरण होते. त्याचवेळेस काही मुठभर लाखो गरिबांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती बाळगून आहेत. जगातील अत्यंत लज्जास्पद विषम समाजापैकी आपण एक आहोत. अन्य देशांच्या विपरीत आपल्या देशात हिंदू जाती प्रथेच्या रुपात विषमतेला संस्थापक स्वरूप देण्यात येत आहे. असे असतांना आपला देश शक्तीशाली भारत कसा होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशातील दलित बहुजन लोकांना जिवंत जाळले जात आहे. त्यासाठी असहिष्णुता हा शब्द योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. स्वातंत्र्य या विषयावर बोलणाऱ्यांना बंदुकीने मारले जात आहे. देशातील सुधारणावादी विचारवंतांना वाईट दिवस आले आहे. विचार संपविण्यासाठी दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याचाच निषेध म्हणून देशातील अनेक विचारवंतांनी शासनाचे पुरस्कार परत करण्याची मोहीम सुरु केली आहे. याच दरम्यान मीही पुरस्कार परत केला मात्र, महात्मा फुले समता परिषदेकडून देण्यात येत असलेला समता पुरस्कार माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पुरस्काराची १ लाख रुपयांची रक्कम तसेच तसेच स्वतःकडील एक लाख रुपये असे एकूण दोन लाख रुपये पंडिता रमाबाई मुक्ती प्रतिष्ठानसाठी त्यांनी यावेळी प्रदान केले.
पुरस्कार सोहळा सुरु असतांना अभाविप कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलतांना त्यांनी म्हटले की समतेचे दैवत महात्मा फुले यांच्या नावाने समता पुरस्कार प्राप्त झाला ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब असून याप्रसंगी निषेध करणेही माझ्यासाठी सन्मानच आहे. दहशतीचे कारस्थान देशाला फुटीकडे नेणारे असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत देशातून जातीव्यवस्था नष्ट होत नाही. तोपर्यंत आपला देश खऱ्या अर्थाने ‘सेक्युलर’ आहे असे म्हणता येणार नाही. असे त्यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी बोलतांना छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, समाजातील दिन दलित वर्गासाठी अखंडपणे काम करणाऱ्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पुस्तकाच्या माध्यमातून जगातील अत्यंत प्रतिष्टेचा पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध प्रागतिक विचारवंत अरुंधती रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार देतांना विशेष आनंद होत आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या त्या महिला असल्याचा देशाला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके उभे करून चालणार नाही तर त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक असून फक्त फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेवून राजकारण करण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सरकारला उद्देशून म्हटले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करीत असतांना प्रस्थापित व्यवस्थेकडून विविध अडचणी निर्माण केल्या जात आहे. मात्र फुले, शाहू, आंबेडकरानी घालून दिलेल्या सहिष्णुतेच्या विचारांमुळेच या अडचणींना न डगमगता समतेचा घेतलेला वसा कधीही सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुलेना भारतरत्न पुरस्कारासाठी भारत सरकारकडे शिफारस केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलतांना ते म्हटले की, जगात फ़क्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी या दोनच महापुरुषांना जनतेने महात्मा ही सर्वोच्च पदवी बहाल केली आहे. त्यामुळे भारतरत्नाच्या पंगतीत त्यांना बसवू नये तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न ही पदवी देण्यात यावी असे सांगून देशात स्वातंत्र्य हे कागदावर राहते काय ? संविधानात स्वातंत्र्यांची जी मांडणी करण्यात आली आहे त्याचे काय ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
पुरस्कार सोहळ्याप्रसंगी निदर्शने करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना उद्देशून भुजबळ आक्रमकपणे म्हणाले की, एकीकडे फुले शाहू आंबेडकरांची स्मारके उभारण्याची भाषा करायची आणि त्यांचेच विचार तळागाळापर्यंत पोहचविना-यांना विरोध करायचा म्हणजेच ‘मुह में राम बगल मे छुरी’ अशी प्रवृत्ती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशाला जातीव्यवस्थेच्या यादवीतून महात्मा फुलेंचेच विचार वाचवू शकतात असे सांगून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समता व शिक्षणाचे जे बिज रोवले त्यांचेच अरुंधती रॉय हे एक उमलेले फुल आहे असे गौरवौदगार त्यांनी काढले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महात्मा फुले यांचा जीवन परिचय देवून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कार्य केल्यामुळे तेच आधुनिक भारताचे खरे निर्माते असल्याचे सांगून फुले शाहू आंबेडकरी लेखिका अरुधंती रॉय यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आमदार जयदेव गायकवाड, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रीतेश गवळी यांनी केले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो समता सैनिकांनी फुलेवाड्यावर हजेरी लावून महात्मा फुले व सावित्रीबाईच्या स्मृतींना अभिवादन केले.
