महावितरणचा पुणेकरांना दिलासा; भारनियमन टाळले

Share this News:

पुणे, दि. 22 : महापारेषणच्या 132 केव्ही वाहिनीतून होणारा 70 ते 80 मेगावॉट वीजपुरवठा तसेच सात उपकेंद्र बंद पडल्यानंतर महावितरणने इतर उपकेंद्रांतील पर्यायी व्यवस्थेतून व विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन करून शुक्रवारी (दि. 22) शहराच्या मध्यवर्ती भागात व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवला.

दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेली 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी जोडण्यासाठी चेन्नई येथून महापारेषणने मागविलेला ‘जाईंट’ आज सायंकाळी पुण्यात पोहोचला आहे. सोबतच वाहिनी जोडणारे तज्ञ कर्मचारीही आले आहेत. या वाहिनीच्या दुरुस्तीला आज सायंकाळी उशिरा सुरवात झाली असून शनिवारी (दि. 23) सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे.

महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटल्यानंतर गुरुवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महापारेषणचे 132 केव्ही जीआयएस व महावितरणच्या 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व पेठांसह लूल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा प्रामुख्याने रास्तापेठ विभाग, पर्वती विभाग व पद्मावती विभागातील सुमारे अडीच लाख वीजग्राहकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्यासह सुमारे 120 अभियंते व कर्मचार्‍यांनी बाधीत झालेल्या भागांत इतर उपकेंद्गातील पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना सुरु केली. रात्री उशिरापर्यंत सर्वच भागातील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरळीत करण्यात आला.

पर्यायी वीजपुरवठ्यासाठी एकाच वेळी 70 ते 80 मेगावॉट विजेचे इतर उपकेंद्गातून भारव्यवस्थापन शक्य करणे नसल्याने विजेचा कमीतकमी वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्यास प्रामुख्याने औद्योगिकसह सर्व ग्राहकांनी प्रतिसाद दिल्याने आज दिवसभर दारुवाला पूल (रविवार पेठ) व मंगळवार पेठ परिसरात प्रत्येकी एक तासांचे चक्राकार पद्धतीने दोन तास भारनियमन करण्यात आले. तर बाधीत झालेल्या उर्वरित सर्व परिसरात भारनियमन टाळून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला.

दांडेकर पुलानजीक फरशी पूलाजवळ तुटलेल्या भूमिगत 132 केव्ही वीजवाहिनीच्या तीनपैकी दोन फेजच्या वाहिन्यांचे जेसीबीच्या धक्क्याने नुकसान झाले आहे. महापारेषणकडून या दोन्ही वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी मागविण्यात आलेला ‘जाईंट’ व तज्ञ कर्मचारी पुण्यात पोहोचले आहेत. शनिवारी (दि. 23) सायंकाळपर्यंत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत महावितरणकडून शहराच्या बाधीत मध्यवर्ती व इतर परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. विजेची मागणी वाढल्यास व भारव्यवस्थापन शक्य झाले नाही, तर नाईलाजाने काही भागात चक्राकार पद्धतीने 3 ते 4 तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी कमीत कमी विजेचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.