महिंद्रातर्फे नव्या ऑफ-रोड वाहनाचे अनावरण: रॉक्सऑर

Share this News:

· साइड x साइड पॉवरस्पोर्ट्स श्रेणीमध्ये उप-श्रेणी निर्माण करून महिंद्रातर्फे रॉक्सऑर दाखल
· महिंद्राने 70 वर्षांपूर्वी आशियामध्ये विलीज वाहनांची निर्मिती करण्याचे लायसेन्स मिळवून ऑटो क्षेत्रात व्यवसायास सुरुवात केली
· महिंद्रातर्फे रॉक्सऑरच्या वितरणासाठी नवे पॉवरस्पोर्ट्स डीलर नेटवर्क सुरू

ऑबर्न हिल्स, मिशिगन, मार्च 6, 2018 — 19 अब्ज उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या व महिंद्राचे उत्तर अमेरिकेतील ऑटोमोटिव्ह मुख्यालय असलेल्या महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिकाने (एमएएनए) महिंद्राच्या रॉक्सऑर — या नव्या ऑफ-रोड वाहनाचे सर्वांसमोर अनावरण केले.

उत्तर अमेरिकेतील ग्राहकांसाठी दणकट, अर्थपूर्ण व उपयुक्त वाहन उपलब्ध करण्याची महिंद्राची परंपरा रॉक्सऑरमार्फतही जपली आहे. औद्योगिक दर्जा व टिकाऊपणा हे महिंद्राचे मूलभूत तत्त्व रॉक्सऑरच्या डिझाइनमध्येही अवलंबले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांच्या मते, “अस्सल, राकट, विशिष्ट उपयोग असलेली वाहने तयार करणे ही महिंद्राच्या 70 वर्षांच्या ऑटोमोटिव्ह इतिहासाची वैशिष्ट्ये आहेत. रॉक्सऑर हे या इतिहासाचे व आमच्या ब्रँडचे प्रतिक आहे.”

साइड x साइड श्रेणीमध्ये प्लास्टिक बॉडी असलेल्या, बेल्ट-ड्रिव्हन वाहनांचा समावेश होत असला तरी रॉक्सऑरमध्ये मात्र बॉक्स्ड स्टील फ्रेमवर स्टील बॉडी, हेव्ही-ड्युटी महिंद्रा टर्बो-डिझेल 4 सिलिंडर इंजिन व ऑटोमोटिव्ह स्टाइल 5-स्पीट मॅन्युअल ट्रान्समिशन असल्याने हे वाहन साधे, पण दणकट आहे.

महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिकाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी रिक हास यांनी सांगितले, “रॉक्सऑरने साइड x साइड उद्योगामध्ये नवी उप-श्रेणी निर्माण केली आहे आणि आम्ही नव्याने नियुक्त केलेल्या डीलर संघटनेकडून आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आम्ही टेक्सासमधील सॅन अँटोनिओ येथे 18-20 मार्च या दरम्यान नॅशनल डीलर मीटिंगचे आयोजन केले असून त्यामध्ये आम्ही उत्पादन दाखल करण्याबद्दल व भविष्यातील वाटचालीबद्दल चर्चा करणार आहोत. आम्ही पहिल्या टप्प्यात 300 डीलरपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि हे उद्दिष्ट शोच्या अखेरीपर्यंत पूर्ण केले जाईल अशी अपेक्षा आहे.”

महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिकाने (एमएएनए) मेट्रो डेट्रॉइटमध्ये रॉक्सऑरची संकल्पना, डिझाइन, इंजिनीअरिंग व निर्मिती केली. एमएएनए हा 19 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग आहे व अलीकडेच कंपनीने मिशिगनमधील ऑबर्न हिल्स येथे नवे एनए ऑटोमोटिव्ह मुख्यालय व उत्पादन केंद्र सुरू केले आहे. महिंद्राने मेट्रो डेट्रॉइटमध्ये निर्माण केलेल्या 400,000 चौरस फुट प्रकल्पाचा (3 प्रकल्पांचा समावेश करत) एमएएनएचे नवे कार्य हा गाभा आहे आणि गेल्या 25 वर्षांत ईशान्य मिशिगनमध्ये काम सुरू करणारा हा पहिला ओईएम उत्पादन/असेम्ब्ली प्रकल्प आहे.