यंदाचा १६ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ११ ते १८ जानेवारी दरम्यान
· या वर्षीच्या ‘पिफ’ची ‘थीम’ ‘तरुणाई’
· ‘वर्ल्ड काँपिटिशन’ विभागातील चित्रपटांची नावे जाहीर
· तब्बल ९१ देशांमधून आलेल्या १००८ चित्रपटांमधून निवडलेले चित्रपट पाहण्याची पुणेकरांना संधी
· ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ विभागात इन्गमार बर्गमन व राज कपूर यांच्या चित्रपटांचा समावेश
पुणे, १८ डिसेंबर, २०१७ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यंदा ११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान होणार असून ‘तरुणाई’ ही या महोत्सवाची प्रमुख ‘थीम’ आहे. ‘पिफ’मध्ये समाविष्ट असलेल्या ‘वर्ल्ड काँपिटिशन’ या विभागातील चित्रपटांची नावे महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली.
या विभागात १४ चित्रपटांचा समावेश आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी या वर्षी तब्बल ९१ देशांमधून १००८ चित्रपट प्राप्त झाले होते. यातील निवडक असे २०० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपटांशी संबंधित विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही महोत्सवात अंतर्भाव असेल, असेही डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केले.
महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त व निवड समिती सदस्य सतीश आळेकर, निवड समिती सदस्य व क्रिएटिव्ह हेड अभिजीत रणदिवे, विश्वस्त सबीना संघवी या वेळी उपस्थित होते.
रवी गुप्ता म्हणाले, ”महोत्सवातील ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागात यंदा जगातील सर्वांत प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक समजले जाणारे मूळचे स्वीडनचे दिग्दर्शक व निर्माते इन्गमार बर्गमन आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर या अद्वितीय कलाकारांवरील चित्रपट दाखवण्यात येणार असून हे या वर्षीचे एक प्रमुख आकर्षण ठरेल. बर्गमन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आवर्जून ‘सिंहावलोकन’ विभागात त्यांच्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे,”
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाच ठिकाणी तब्बल १० स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यात पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, मंगला मल्टीप्लेक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) यांसह पिंपरी चिंचवड मधीलही एका चित्रपटगृहाचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील चित्रपटगृहाचे नाव लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “कोणत्याही देशाची मोठी आणि महत्त्वाची ताकद म्हणजे तरुणाई. संपूर्ण जग भारताकडे एक तरूण राष्ट्र म्हणून पाहते. उत्साहाने सळसळणाऱ्या आणि स्वतःचा वेगळा विचार असलेल्या तरुणाईची भाषा चित्रपटांमधून वेगवेगळ्या प्रकारे समर्थपणे व्यक्त होत आहे. हे लक्षात घेऊन या वर्षी महोत्सवाची प्रमुख ‘थीम’ तरुणाई अशी निवडण्यात आली आहे. तरुणाईचे भावविश्व उलगडणारे काही जागतिक दर्जाचे निवडक चित्रपट या वर्षीच्या महोत्सवात पाहता येणार आहेत.’’
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील चित्रपट विभाग खालीलप्रमाणे –
स्पर्धात्मक विभाग
१) वर्ल्ड काँपिटिशन
२) मराठी काँपिटिशन
इतर विभाग-
१) स्टुडंट इंटरनॅशनल सेक्शन
२) ‘जस्ट ज्यूरीज’ विभाग
३) आंतरराष्ट्रीय चित्रपट
४) आशियातील चित्रपट
५) भारतीय चित्रपट
६) देश विशेष (कंट्री फोकस)- अर्जेंटिना व इटली
७) विभिन्न देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप)
८) सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह)- इन्गमार बर्गमन आणि राज कपूर
९) तरुणाई (यूथ)
१०) माहितीपट
११) आजच्या काळातील मराठी चित्रपट
१२) ट्रीब्यूट
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रातिनिधिक नोंदणी प्रक्रियेची माहिती- www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून ११ डिसेंबरपासून ही नोंदणी सुरु करण्यात आली आहे. वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाबरोबर इच्छुकांनी सिटी प्राईड- कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा मंगला चित्रपटगृह येथे जाऊन ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’ करणे अपेक्षित आहे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन २० डिसेंबरपासून वर सांगितलेल्या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत करता येणार आहे.
विद्यार्थी, ‘फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील ) यांना ओळखपत्र दाखवून रुपये ६०० मध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० इतके आहे.
‘वर्ल्ड काँपिटिशन’ विभागातील चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे-
१) ‘आय अॅम नोबडी’, दिग्दर्शक- मुहर्रम ओझाबाट, देश- टर्की
२) ‘रेक्विअम फॉर मिसेस जे.’, दिग्दर्शक- बोजान वुलेटिक, देश- सर्बिया
३) ‘फ्री अँड इझी’, दिग्दर्शक- जून जेंग, देश- चीन
४) ‘वूमन ऑफ द वीपिंग रिव्हर’, दिग्दर्शक- शेरॉन डायॉक, देश- फिलिपिन्स/ फ्रान्स
५) ‘युथनायझर’, दिग्दर्शक- तीमू निक्की, देश- फिनलँड
६) ‘गोलियथ’, दिग्दर्शक- डॉमिनिक लोचर, देश- स्वित्झरलँड
७) ‘द लाँगिंग’, दिग्दर्शक- जोराम ल्युर्सन, देश- नेदरलँडस्
८) ‘झामा’, दिग्दर्शक- ल्युक्रेशिया मार्टेल, देश- अर्जेंटिना/ ब्राझिल/ स्पेन/ फ्रान्स/ नेदरलँडस्/ पोर्तुगाल/
मेक्सिको/ यूएसए
९) ‘मोअर’, दिग्दर्शक- ओनुर सेलॅक, देश- टर्की
१०) ‘द नथिंग फॅक्टरी’, दिग्दर्शक- पेद्रो पिन्हो, देश- पोर्तुगाल
११) ‘आय अॅम अ किलर’, दिग्दर्शक- मासिएज पिप्झिका, देश- पोलंड
१२) ‘जॅम’, दिग्दर्शक- टोनी गाटलिफ, देश- टर्की/ ग्रीस/ फ्रान्स
१३) ‘द क्वार्टेट’, दिग्दर्शक- मिरोस्लाव्ह क्रोबॉट, देश- झेक रीपब्लिक
१४) ‘नॉक्टर्नल टाईम्स’, दिग्दर्शक- प्रियानंदनन, देश- भारत