समाविष्ट गावातील नागरिकांना दिलेला शद्ब पाळला – आमदार महेश लांडगे

just pune things app
Share this News:

पिंपरी, 14 डिसेंबर – ”पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गावातील नागरिकांना विकासकामांचा दिलेला शद्ब मी पाळला आहे. समाविष्ट गावातील 425 कोटींचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थायी समितीने देखील मान्यता दिली. विधानसभा निवडणुकीवेळी समाविष्ट गावातील नागरिकांनी मला मोठी साथ दिली. तसेच पालिका निवडणुकीत भाजपचे जास्त नगरसेवक निवडून देण्याचे मी केलेल्या आवाहनाला देखील जनतेने साथ देऊन भाजपचे जास्त नगरसेवक निवडून दिले. त्यामुळे पालिकेत भाजपची सत्ता आली आहे. समाविष्ट गावातील नागरिकांना विकास करण्याचा दिलेला शद्ब मी पाळला आहे. यापुढे देखील समाविष्ट गावांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे”, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ”विधानसभा निवडणुकीवेळी समाविष्ट गावातील नागरिकांना मी विकास करण्याचा शद्ब दिला होता. नागरिकांनी माझ्या शद्बाला मान देऊन मला मोठे सहकार्य केले. समाविष्ट गावातून अधिकचे मतदान मिळाले. पालिका निवडणुकीपूर्वी ‘व्हिजन 20-20’ मिशन सुरु केले. त्याअंतर्गत समाविष्ट गावे विकसित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन समाविष्ट गावातील नागरिकांना केले होते. भाजपची सत्ता आल्यास समाविष्ट भागातील नगरसेवकाला मोठे पद देण्याचे मान्य केले होते. या परिसरातील नागरिकांनी माझ्या आवाहनाला साथ दिली आणि भाजपचे नगरसेवक निवडून दिले. त्यानंतर भाजपचा पहिला महापौर समाविष्ट गावातील केला. आजवर कधीही समाविष्ट गावातील व्यक्तीला पालिकेतील महत्वाचे पद मिळाले नव्हते”.

”गेल्या 35 वर्षाच्या इतिहासात समाविष्ट गावाला न्याय मिळाला नव्हता. परंतु, भाजपने समाविष्ट गावातील नागरिकांना न्याय दिला आहे. समाविष्ट गावात 425 कोटी रुपयांच्या खर्चाची कामे केली जाणार आहेत. गेल्या 20 वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावेळी पुणे-आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण येतो. त्यामुळे या मुख्य रस्त्याला पर्यायी असलेले रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे च-होली ते लोहगावला जोडणारा रस्ताही विकसित केला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह शिरूर, खेड, आंबेगाव, चाकण, या ग्रामीण भागातील नागरिकांना लोहगाव विमानतळापर्यंत विश्रांतवाडीवरून न जाता च-होलीमार्गे अवघ्या दहा मिनिटांत पोचता येणे शक्य होणार आहे”, असेही आमदार लांडगे म्हणाले. महापौर नितीन काळजे आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचे यासाठी मोठे सहकार्य मिळाले आहे. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे ही कामे होणार आहेत. याबाबत महापौर काळजे आणि स्थायीच्या अध्यक्षा सावळे यांचे आमदार महेश लांडगे मनापासून आभार मानले”.

महापौर नितीन काळजे म्हणाले, ”पालिकेतील समाविष्ट गावात 20 वर्षांपासून रस्ते झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्याने आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावाचा विकास होत आहे. रस्ते झाल्यावर शेतक-यांना मोठा फायदा होईल. समाविष्ट गावातील चांगला विकास होऊन नागरिकरण वाढेल. मोठ-मोठे प्रकल्प येतील. त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे”.

स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाले, ”विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात विकास आराखडा निधी हा नवीन लेखाशीर्ष तयार करून 205 कोटींची तरतूद करण्यात आली. तसेच विकास आराखड्यातील दर्शविण्यात आलेले जागा ताब्यात घेतलेले व जागा अंशतः ताब्यात असलेले 75 नवीन रस्ते विकसित करण्याची सर्व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे रस्ते करत असताना गेल्या 20 वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आहे”, असेही सावळे म्हणाल्या.