सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तर्फे कचरा व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्र

just pune things app
Share this News:

पुणे : सिंबायोसिस विश्वविद्यालय (अभिमत विद्यापीठ), सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तर्फे कचरा व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्राचे मंगळवारी (ता. १३) आयोजन करण्यात आले होते. डॉ. इशेर जज अहलुवालिया आणि प्रा. शरद काळे हे यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते.

डॉ. अहलुवालिया या नामांकित अर्थशास्त्रज्ञ असून, त्या इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशनच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षही आहेत. प्रा. काळे हे सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट चे संचालक आहेत.

सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय हॉल मध्ये हे चर्चासत्र झाले. सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स बीएससी इकॉनॉमिक्स व एमएससी इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि सिम्बायोसिस विश्वविद्यालयाच्या (अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यावेळी उपस्थित होते.

सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा कचरा व्यवस्थापन या विषयावरील प्राथमिक आणि दुय्यम संशोधन प्रकल्प ही थीम होती. त्याअंतर्गत घरात निर्माण होणारा कचरा, उरलेले अन्न, इलेक्ट्रॉनिक कचरा, बायो मेडिकल कचरा, मानवी शवपेटी, आदीचे व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांनी संशोधन केले होते. निवडक ग्रुपमधील विद्यार्थ्यांनी प्रमुख वक्त्यांसमोर संशोधनाचे सादरीकरण केले.

सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संचालक डॉ.ज्योती चंडीरमानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासंबंधी अमुल्य मार्गदर्शन झाले आहे. त्यामुळे विषयाची समजही वाढण्यास मदत होणार आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

डॉ. अहलुवालिया म्हणाल्या, “कचरा व्यवस्थापनामध्ये पुणे हे सर्वोत्तम शहर आहे. येथे घरोघरी कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरणाचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. तसेच, ‘स्वच्छ’ संस्थेचा उपक्रमही फायदेशीर ठरत आहे. कचरा व्यवस्थापन ही व्यापक समस्या असून सर्व ठिकाणी ते एकच व्यवस्थापन प्रणाली एकच व्यवस्थापन प्रणाली कार्यरत नसते. तसेच. सार्वजनिक खासगी भागिदारीत (पीपीपी) व काही खासगी संस्थांकडून कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र, त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे.”

कचरा व्यवस्थापनामध्ये निर्माण होणारा कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण किंवा विल्हेवाट याबाबत खात्रीलायक आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण हे अंदाजे निश्चित केले जाते, असेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांचा प्रकल्प पाहताना डॉ. अहलुवालिया यांनी, कचरा डंपिंग केल्या जाणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्याचे परीक्षण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, कचरा व्यवस्थापनावरील संशोधन प्रकल्प पाहुन त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि या विषयावर विद्यार्थी संवेदनशील असल्याचे पाहुन समाधान व्यक्त केले.

सर्व नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या कायद्यांबाबत जागरूकता आणण्याची गरज आहे.

कचरा कशाला म्हणावे, कचऱ्यापासून होणारी खत निर्मिती याची माहिती दिली पाहिजे. नागरिकांना ओला व सुका कचरा एकत्र न करण्याबाबत उद्युक्त केले पाहिजे, असेही डॉ. अहलुवालिया यांनी सांगितले.

इ-कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात नाही. तसेच, यासंबंधीच्या कायद्याचेही पालन होताना दिसत नाही. इ-कचरा ट्रकमधून गोळा करणे आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर करणे, त्याद्वारे काही प्रमाणात कचरा निर्मितीचा डेटा गोळा करणे शक्य होईल. महापालिकांना ही यंत्रणा वापरणे शक्य आहे. मुंबई महापालिका याचा वापर करीत असून त्यांना काही प्रमाणात डेटा प्राप्त झाला आहे, असे प्रा. काळे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्रालयाकडून इ-कचऱ्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचा काही प्रमाणात आभाव आहे. मंत्रालयाकडून याबाबत जागरूकता निर्माण करणे अपेक्षित असून, नेमका इ-कचरा कशाला म्हणायचा याचे धोरण ठरविले पाहिजे, असे डॉ. अहलुवालिया म्हणाल्या.

बायो मेडिकल कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास त्यापासून रोगराई पसरू शकते. अशा कचऱ्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक व योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांची वृत्ती बदलण्याची गरज आहे. पाश्चात्य देशांमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती आणि पूनर्वापरावर भर दिला जातो. त्याचे अनुकरण आपल्याकडे केले गेले पाहिजे, असे प्रा. काळे म्हणाले.