सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्राथमिकता द्या प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. पावडे यांचे निर्देश

Mahavitaran-Logo
Share this News:

पुणे, दि. 25 जुलै 2019 : पावसाळी परिस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात देखील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी प्राथमिकता द्यावी तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश प्रभारी पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे यांनी दिले. पुणे परिमंडलातील भोसरी, पिंपरी, शिवाजीनगर आणि कोथरूड या विभाग कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि. 23) प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. पावडे यांनी वीजपुरवठ्याचा आढावा घेतला.
यावेळी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री.

पंकज तगलपल्लेवार उपस्थित होते. प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. पावडे म्हणाले, वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. सध्या पावसाळा सुरु असला तरी वीजपुरवठा खंडितच होणार नाही यासाठी अभियंता व जनमित्रांनी योग्य उपायययोजना करावी. वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम संबंधीत वीजग्राहकांनी एसएमएसद्वारे तात्काळ माहिती द्यावी व त्यामध्ये वीजपुरवठा सुरु होण्याची संभाव्य वेळ नमूद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश श्री. पावडे यांनी दिले. यावेळी
प्रत्येक विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती व सुधारणा तसेच वीजपुरवठ्याची पर्यायी सोय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीला संबंधीत विभागांचे कार्यकारी अभियंता सर्वश्री शिवाजी वायफळकर, राहुल गवारे, अमित बारटक्के यांच्यासह सर्व उपविभाग कार्यालयप्रमुख
अभियंता व शाखा कार्यालयप्रमुख अभियंता यांची उपस्थिती होती.