नोकरदारांनी बचतीचे रुपांतर गुंतवणूकीत करावे : नंदकुमार काकिर्डे
पुणे :
नोकरदारांनी आपल्या गुंतवणूकीचा प्लान तयार ठेवला पाहिजे. सेव्हिंगचे रुपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे, ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी केले.
‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज ‘ ,सिनर्जी फाऊंडेशन आयोजित ‘ सिनर्जी संवाद ‘ या उपक्रमात ते बोलत होते. सिनर्जी सभागृह , एरंडवणे येथे हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी झाला.
सिनर्जी हॉलिडे व्हिलेज चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते नंदकुमार काकिर्डे यांच्या अर्थसाक्षरता विषयातील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
काकिर्डे म्हणाले , ‘सध्याच्या काळात पगारात भागत नाही, मग बचत कशी करायची हा प्रश्न पडतो. बचत, सेव्हींग, इन्व्हेस्टमेंट या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे. बँकेतील सेव्हिंग वर ४ टक्क्याहून अधिक पैसे व्याज म्हणून मिळत नाही. शिवाय त्या पैशाची पर्चेसिंग व्हॅल्यू कमी होते.
सोन्यात कधीही गुंतवणूक करू नये.ती मृत गुंतवणूक ठरते. नोकरदारांनी आपल्या गुंतवणूकीचा प्लान तयार ठेवला पाहिजे. सेव्हिंगचे रुपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे.
तरुण वयात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स कडे आधी लक्ष द्यावे. शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नंतर लक्ष द्यावे. रिअल इस्टेट गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, म्हणून काळजीपूर्वक विचार करावा, असे काकिर्डे यांनी सांगितले.
इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही, तर आपत्कालिन व्यवस्था आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच गुंतवणूक करताना जोडीदाराबरोबर सल्लामसलत केली पाहिजे.
राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले. दीपक बीडकर यांनी आभार मानले.
