भक्तीकाव्ये आणखी व्यापक व्हावीत – अशोक वाजपेयी
पुणे, दि. २ एप्रिल : भक्तीकाव्ये ही भारतीय संस्कृतीचा अभिजात भाग आहेत. भारतातील लोकशाहीचे प्रातिनिधिक उदाहरण गेल्या अनेक दशकांत प्रामुख्याने याच भक्तीकाव्यांमधून दिसून येत आहे, त्यामुळे ही भक्तीकाव्ये भाषांताराच्या माध्यमातून अधिक व्हापक व्हावीत, असे प्रतिपादन प्रसिद्ध हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी केले. पीआयसी अर्थात पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि रझा फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित ‘भक्ती : मेनी व्हॉईसेसे, मेनी वेज’ या कविता महोत्सवाचे उद्घाटन वाजपेयी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, सदस्या लतिका पाडगांवकर, प्रिया छाब्रिया यांबरोबरच देशातील अनेक कवी, भक्ती काव्यांचे अनुवादक यावेळी उपस्थित होते.
भक्ती काव्यांविषयी बोलताना अशोक वाजपेयी म्हणाले, “काव्य हे भारतीय जनमानसाशी जोडले गेले आहे. या काव्याच्या माध्यमातून गेल्या अनेक दशकांत वैचारिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय घटनांचे विश्लेषण समाजातील प्रत्येक स्तरातील कवी करत आला आहे. भक्ती काव्य हाही सामाजिक स्थिती दर्शविण्याचा एक प्रकार असून याद्वारे सध्याच्या सामाजिक परिस्थितीतील अपेक्षित बदल आणि त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख महत्वाचा मानला गेला आहे. भक्ती काव्य ही कोणत्याही जाहिरनाम्या शिवाय सुरु झालेली एक चळवळ असून भारतात गेल्या कित्येक वर्षांत काव्य क्षेत्रात चालत आलेल्या लोकशाहीचे दर्शन ती घडविते.’’
आज देशात भक्ती आणि भक्तांची एक लाट आली आहे. त्यामुळे भक्ती काव्याचे स्फुरणच जणू सर्वांना चढले आहे. मात्र एकीकडे हे होत असताना भक्ती काव्याची परंपरा त्याचा उगम आणि त्याचा परिणाम समजून घेण्याची गरज आहे. भक्तीकाव्ये ही त्या त्या भागातील आणि मुख्यत: बोलीभाषेतील असल्याने त्यांचे आणखी व्यापक स्वरूप भाषांतराच्या माध्यमातून सर्वांसमोर येणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी वाजपेयी यांनी व्यक्त केले.
या काव्य महोत्सवा दरम्यान ९ व्या शतकात होऊन गेलेल्या तमिळ वैष्णव कवी नम्मलवार, १५ व्या शतकातील अभिरामी भट्टर, संत मीराबाईंची भजने, रहीम अब्दुर रहिम यांचे दोहे, सुफी भक्तीगीत, काश्मिरी कवी लालदेड यांच्या रचना, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचे अभंग यांसारख्या अनेकविध भक्तीकाव्यांचे सादरीकरण सहभागी अनुवादकांनी केले. यामध्ये प्रिया छाब्रीया, राहुल सोनी, मुस्तनसिर दळवी, एच. एस शिवप्रकाश, रणजीत होस्कोटे, मंदार आणि दखशायनी कारंजकर व सुरेश छाब्रीया आदी मान्यवरांचा प्रामाख्याने सहभाग होता.
