कामगारविरोधी सरकारला आपली ताकद दाखवा – खा. शरद पवार

Share this News:

मुंबई, दि. १५ जून १६ – : राज्यातील आणि देशातील सरकार हे कामगारविरोधी सरकार आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. हे सरकार कामगारांपेक्षा उद्योजकांच्या हिताची जपणूक करताना दिसत असून अशा सरकारविरोधात सर्व कामगारांनी एकत्र य़ेऊन तुमची ताकद दाखवा, असे शक्ती प्रदर्शन करा की सरकारला धडकी भरली पाहीजे, सर्व कामगारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खांद्याला खांदा लावून उभा राहील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री शशिकांत शिंदे आमदार नरेंद्र पाटील, सरचिटणिस पीतांबर मास्तर, आ. किरण पावसकर, यशवंत भोसले, अॅड. एम अकोलकर, सरचिटणीस मुनाफ हकिम, प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते.

सर्वात जास्त कामगारांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. मुंबई ही कष्टकऱ्यांची आहे. एकेकाळी या मुंबईवर त्यांचेच वर्चस्व होते. लोकमान्य टिळकांना अटक झाल्यानंतर मुंबईतल्या कामगारांनी सहा दिवस बंद करून ब्रिटीशांनाही आपली ताकद दाखवली होती. तशीच अन्यायकारक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व कामगारांनी एकत्र येऊन या सरकारला आपली ताकद दाखवून द्या, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले. कामगार चळवळीचा उदय हा मुंबईतून झाला. कामगारांना नेतृत्वाची फळी याच मुंबईने दिली. कामगारांच्या चळवळींना दिशा देण्याचे कामही मुंबईने केले. पण सध्या तशी स्थिती दिसत नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.

उत्पादन वाढले पाहीजे, देशाच्या संपत्तीत भर पडली पाहीजे, हे करण्यासाठी घाम गाळणाऱ्या कामगारांच्या हिताची जपणूक ही झालीच पाहीजे याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कामगारांनी त्यासाठी संघटना मजबूत कराव्यात असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सध्या असंघटीत कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांना आपण संघटीत करू शकलो नाही हे कामगार नेत्यांचे अपयश आहे. कंत्राटी कामगारांचा प्रश्न मोठा आहे, पण केंद्र आणि राज्य सरकारचे या कंत्राटी कामगार पद्धतीला पाठबळ आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. बेरोजगारीमुळे कंत्राटी कामगार म्हणून काम करण्याची तयारी तरूण करत आहेत. त्यांना कोणतेही संरक्षण नाही. हे चित्र बदलले पाहीजे, त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.

सध्याच्या सरकारला कामगारांची फिकीर नाही. कामगारांच्या बाजूने असलेला प्रचलित कामगार कायदा बदलण्याचा या सरकारने घाट घातला आहे. कामगारांच्या कल्याणापेक्षा उद्योजकांचे हीत जपले जात आहे. कामगारांपेक्षा त्यांनाच जास्त अधिकार दिले जात आहेत. कामगारवर्गासाठी हा चमत्कारिक काळ आहे. कामगार कायद्यात अनेक बदल केले जात आहेत. यापूर्वी १०० कामगार असलेल्या कारखान्यांना बंद करताना सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. पण आता ती संख्या वाढवून ३०० करण्यात आली आहे. या
सर्व बदलांमुळे कामगारवर्ग उघड्यावर पडेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.

उद्योग जगला पाहीजे ही आपली भूमिका आहे. पण कामगार जगला तर उद्योग जगेल. कामगारांना उद्ध्वस्त करू नका असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारला कामगारांशी काही देणे घेणे नाही. या राज्याच्या कामगार मंत्र्यांचे नाव ऐकल्यावर त्यांचे आणि कामगारांचा संबंध काय, असा प्रश्न पडला. पण त्यांच्या सरकारचा भाग म्हणून अशा व्यक्तीला कामगार मंत्री केले असेल असा टोलाही पवार यांनी लगावला. त्यामुळेच की काय संपूर्ण कामगार विभाग मालकांच्या आणि उद्योजकांच्या हिताची जपवणूक करण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कामगार कायद्याच्य़ा मूळ गाभ्यावरच हल्ला करण्याचे काम सध्याच्या सरकारने चालवले असल्याचा आरोप केला. कामगारांनी आता स्वस्थ बसू नये, संघटीत होऊन संघर्ष करावा, असे यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तर पवारसाहेबांनी निर्देश दिल्यास कामगारांच्या प्रश्नांसाठी लाखो कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात आणू, असे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. कामगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कंत्राटदारी पद्धत आली आहे, त्यालाच विरोध करण्याची गरज आमदार किरण पावसकर यांनी बोलून दाखवली. तर माथाडी कामगारांना उद्ध्वस्त करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचे यावेळी आमदार नरेंद्र पाटील यांनी
सांगितले.