मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा – अजित पवार 

Share this News:

मुंबई – दि.3 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ.अजित पवार यांनी महाड पूल दुर्घटनेच्या मुद्द्यावर आक्रमक होत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधानसभेत केली. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा पूल वाहून गेला आहे. या पुरात 2 एसटी बसेस आणि 7 ते 8 वाहून गेली असून, यामधील प्रवाशांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिले. या पुलाचे मे महिन्यातच ऑडिट झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाचे ऑडिट करून पूल सुरक्षित असल्याचा अहवाल दिला होता, असे पाटील यांनी सांगितले. मात्र अजित पवार यांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला. हा पूल ब्रिटीशकालीन होता, तसेच त्याची पाहणी झाली होती. पूल प्रवासासाठी सुरक्षित होता असे चुकीचे ऑडिट झालेच कसे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. महाड येथील पूल कोसळेपर्यंत राज्य सरकारने खबरदारी का घेतली नाही? हवामान खात्याने इशारा देऊनही वाहतूक का रोखली नाही? नवा पूल बांधलेला असताना, जुना पूल वाहतुकीसाठी बंद का करण्यात आला नाही. जर तो पूल वाहतुकीसाठी बंद केला असता, तर आज या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या लोकांचे प्राण वाचले असते, असेही अजित पवार यांनी
सरकारला सुनावले. त्यामुळे या दुर्घटनेस राज्यसरकारच जबाबदार असून मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पवार यांनी केली.