कोपर्डी अत्याचारग्रस्त कुटुंबातील बहीणभावांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची – खा. शरद पवार

Share this News:

मुंबई – दि.31 जुलै 2016 : आज कोपर्डी अत्याचारग्रस्त कुटुंबाशी संवाद साधून खा. शरद पवार यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले. त्याचबरोबर पीडित मुलीच्या बहिणीच्या व भावाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण घेत आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

यावेळी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची सोय बारामतीमध्ये करण्यात येईल, त्यासाठी त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही तेथे केली जाईल, असे खा.शरद पवार यांनी सांगितले.‘समाजात तेढ निर्माण न करता शांतता बाळगल्या बद्दल त्यांनी कोपर्डी ग्रामस्थांचे कौतुक करत सर्वांना सलाम करतो,’ असे उद्गार काढले. दोषींना कठोर शासन करण्याची विनंती आपण प्रशासनाला करणार आहोत; अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली तरच अशा मानसिकतेवर जरब बसेल आणि अशा घटनांना आळा बसेल, असे ते म्हणाले. बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित नवीन कायदा करण्यासाठी वेळ लागेल.

सध्याच्या कायद्यानुसार आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.दिलिप वळसे-पाटील, शिवाजीराव नागवडे, आ. राहुल जगताप, आ. अरुण जगताप, जि.प. अध्यक्षा मंजुषा गुंड त्यांच्या समवेत होते.