एक सॅल्यूट एक सेल्फी ! #IamwithKhaki

Share this News:

By Harshal Korhale

आता पोलिसांवर हात उगारणे बस्स ! हात वर गेला पाहिजे तो फक्त त्यांच्या कामाला सलाम करून सेल्फी घेण्यासाठी !!

तुम्ही पोलिसांच्या कामाला सलाम करून सेल्फी घेतला का?

थोड्या वेळाने चौकात मांडव नसेल, मखर नसेल, विघ्नहर्ता रक्षणकर्त्या श्रींची मूर्ती नसेल, कार्यकर्ते नसतील आणि दर्शन घ्यायला आलेले भाविक ही नसतील…

पण त्याच चौकात एक व्यक्ती मात्र तुम्हाला कायम असलेली दिसेल, हि व्यक्ती गणेशउत्सवात पण नाक्यावर अहोरात्र होती आणि गणेशउत्सव संपल्यावर पण चौकात हि व्यक्ती दिसेल …

हेच ते माझे कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस, मनुष्यरुपातले माझे विघ्नहर्ता आणि रक्षणकर्ता…

पण गेल्या काही दिवसातल्या घटनांनी माझ्या ह्या विघ्नहर्त्या पोलीस बांधव भगिनीचे मनोधैर्य ढासळते आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ..

Licence मागितले म्हणून डोक्यात बांबूचे फटके खाऊन कोणाला हुतात्मा व्हावे लागले, तर कोणाला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला, टोळ्यांनी जाऊन मोठी ओळख सांगून पोलिसांना अरेरावी करण्याच्या घटना तर दररोजच्याच..

महिला पोलिसांना त्रास देण्याची, छेड काढायची तर गुंडापुंडांना सवयच लागली आहे..

आत्तापर्यंत गैरकामे करण्यासाठी पोलिसावर दबाव आणणाऱ्या राजकारण्याची हिम्मत आता खाकीची कॉलर धरण्यापर्यंत गेली आहे ….

भिवंडी मध्ये जाळून मारलेल्या पोलिसांच्या केस चा निकाल पण हायकोर्ट कडून काल आला, पुरावा नाही म्हणून आरोपींना सोडून देण्यात आले …..

समस्या मांडायला, संप करायला संघटना काढायचा अधिकार नाही..

राजाने मारले आणि निसर्गाने झोडपले आता न्याय मागायला जावे कुठ अशी आपल्या पोलीस बांधवांची सध्याची परिस्थिती आहे, तुमच्या माझ्या रक्षणासाठी केलेला शरीराचा मनाचा कोट मोडून पडण्याची वेळ पोलिसांवर आली आहे …

आता वेळ आहे ती तुम्ही आम्ही पुढे येऊन समाज म्हणून आपली ताकद त्यांच्या पाठीमागे उभी करायची..

आत्तापर्यंत त्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्या आता त्यांच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी त्यांच्या सोबत उभे राहण्याची…

अनंत चतुर्दशीला पोलीस जेव्हा पोलीस पुन्हा ३०-३६ तासाची duty करायला रस्त्यावर सज्ज होतील, एक छोटीच गोष्ट करा…

आत्ता पर्यंत जीवलगांसोबत तुम्ही भरपूर सेल्फी घेतल्या, आता एक सेल्फी आपल्या पोलीस बांधवांच्या कामाला सलाम म्हणून होऊन जाऊ दे …

सेल्फी घेताय तर जवळ दिसणाऱ्या कोणत्याही पोलीस बांधव भगिनीशी तुमचा आपुलकीने संवाद होऊ दे, सेल्फी म्हणजे आमचे कायदा पालन करण्यासाठी तुम्हाला पूर्ण सहकार्य आहे असा शब्द त्यांना मिळू दे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही सेल्फी म्हणजे आमच्या मनात पोलिसांचा सन्मान कायम आहे असा विश्वास त्यांच्या मनात दृढ होऊ दे …

‘सेल्फी विथ खाकी’ हे संवाद, सहकार्य आणि सन्मानाचे परिणामकारक माध्यम होऊन जाउ दे …

आम्ही नागरिक म्हणून कायदा पालनाच्या कर्तव्यात तुमच्या सोबत आहोत असा संदेश पोलीस बांधवभगिनी मध्ये आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्या अपप्रवृत्ती आणि गैरकामांसाठी दबाव आणणाऱ्या राजकारण्यांच्या आम्ही निषेध करतो असे दोन्ही संदेश तुमच्या सेल्फी च्या माध्यमातून जाऊ दे ….

तुम्ही गणेशमंडळाचे कार्यकर्ते असा किंवा ढोल ताशा पथकातील वादक किंवा मिरवणूक पाहायला आलेले भाविक श्रोते, एक सेल्फी पोलिसांसोबत घ्या आणि पोलिसांना बळ द्या ….

सेल्फी तुमच्या Facebook account वरून #IamwithKhaki हा hashtag वापरून share करा, जमले तर त्या पोलिसांना tag करा आणि हा उपक्रम सर्व मित्रमैत्रीणीत घेऊन जा …

पोलीसांवर होणारा अन्याय आणि त्यांच्या समस्या ह्यावर सेल्फी हा उपाय नक्कीच नाही, पण सेल्फी च्या निमित्ताने सुरवात तर होऊ दे..

बाप्पा विघ्नहर्ता-रक्षणकर्त्याला निरोप दिला दिला तरी मनुष्यरुपी विघ्नहर्त्या-रक्षणकर्त्या पोलीसांसोबत आम्ही सदैव आहोत हा संदेश तर जाऊ दे