उत्सवकाळातील वीजपुरवठ्याच्या नियोजनासाठी ऊर्जामंत्र्यांकडून महावितरणचे अभिनंदन

Share this News:

राज्यात गणेशोत्सवाच्या काळात विजेची सरासरी कमाल मागणी 17,800 मे.वॅ. एवढी वाढली होती. महावितरणच्यावतीने मागणी एवढाच वीजपुरवठा करण्यात आला.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यात सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्याबाबत प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले.

याच काळात कृषीपंपांना दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वाढ करण्यात आली. दि. 8 सप्टेंबर 2016 पासून कृषीपंपांना 8 तासांऐवजी 12 तास वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

कृषीपंपांना दिल्या जाणाऱ्या विजेमुळे व गणेशोत्सवाच्या काळांत विजेची मागणी वाढल्याने महावितरणच्या यंत्रणा भारीत झाली. तथापि, वहन यंत्रणा सक्षम असल्याने उत्सव काळांत वीज वहनात कुठेही अडथळा निर्माण झाला नाही.

प्रभावी नियोजनामुळे राज्यात गणेशोत्सवाच्या काळात अखंडित वीजपुरवठा करण्यात आला तसेच शेतकऱ्यांनाही 12 तास वीज मिळत आहे.

विजेची मागणी वाढली असतानाही जनतेला अखंडित वीज मिळाल्याबद्दल ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.