26 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘खोपा’

just pune things app
Share this News:

 

‘खोपा’ म्हटला की आजही बहिणीबाई चौधरींच्या ‘खोपा’ या कवितेची अनाहुतपणे आठवण येते. सुगरणीच्या खोप्यावरीलही कविता मानवालाही मार्गदर्शन करणारी ठरली. असाच एक ‘खोपा’ 26 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा खोपा मानवी नातेसंबंध आणि भावभावनांनी विणलेला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे तिथे ‘खोपा’ दोन मनांमधील दूरी कमी करून मानवतेचा संदेश देत जनमानसांपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून एक संदेश पोहोचवतो. निर्माते जालिंदर भुजबळ यांनी महागणपती फिल्म्सच्या बेनरखाली ‘खोपा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्मिती अर्जुन भुजबळ यांची असून डॉ. सुधीर निकम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मनोरंजनातून समाजप्रबोधन या विचारधारेतून जालिंदर भुजबळ यांनी ‘खोपा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर लेखन करणाऱ्या डॉ. सुधीर निकम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आजवरच्या कारकिर्दात निकम यांनी बऱ्याच चित्रपटांचं यशस्वी लेखन केलं आहे. लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळताना समाजाला हितकारक ठरावं असं कथानक चित्रपटाद्वारे मांडण्याचा विचार निकम यांच्या मनात आला आणि त्यातून ‘खोपा’ची कथा विणण्यात आली. आजच्या पैशांच्या युगात मानवी नातेसंबंध कमी मोलाचे वाटू लागले आहेत. पैशाने सर्व काही विकत घेता येते या आविर्भावात आपल्या जीवाभावाच्या नात्यांना दूर लोटणाऱ्यांना नंतर आपल्या कृत्याचा पश्चाताप होतोच, पण एखाद्याच्या जीवनात घडललेल्या दुर्घटनेने त्याचे नातेवाईकच हिरावून घेतले तर त्याने कोणाकडे पाहायचं? अशा परिस्थितीत त्याच्या डोक्यावर मायेचं छत्र धरण्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा? यांसारखे प्रश्न ‘खोपा’च्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले असून निकम यांनी कथानकाच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वतःच्या मुलाला कोणीही आपलं मानतो, पण दुसऱ्याच्या मुलाला आधार देतो तोच खरा माणूस या विचारातून ‘खोपा’ची कथा तयार झाल्याचं निकम यांचं म्हणणं आहे. या चित्रपटाची कथा एका लहान मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. या लहानग्याच्या आयुष्यात एक वादळ  येतं. या वादळात  त्याचं सर्वस्व हरवतं. एका क्षणात पोरक्या  झालेल्या या लहानग्याचं पुढे काय होणार असा विचार मनात येत असतानाच एक एक करून त्याचे मानलेले नातेवाईक पुढे येतात आणि त्याचं जीवन सुखकर करतात असा याचित्रपटाचा आशय आहे. चित्रपटाची कथा जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी लहान मुलांच्या भावविश्वावर नसून त्याभोवतीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. आज समाजात एकमेकांबद्दल अनास्था पसरली असताना ‘खोपा’ हा चित्रपट मनामनांत आस्थेची ज्योत पेटविण्याचं काम करेल अशी भावना निर्माते जालिंदर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. थोडक्यात काय तर ‘खोपा’मध्ये आजच्या नकली जगातील खऱ्या माणसांची कथा पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या कथालेखनसोबतच गीतलेखनही निकम यांनीच केलं आहे. त्यावर संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी स्वरसाज चढवला आहे.

आशय आणि विषयाच्या जोडीला दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे ‘खोपा’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ह्दयाला भिडणाऱ्या या चित्रपटात संकर्षण कऱ्हाडे, ऐश्वर्या तुपे, यतिन कार्येकर, रूपलक्ष्मी चौगुले, भारत गणेशपुरे, आशा तारे,केतन पवार आणि विक्रम गोखले प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहे. याशिवाय सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडेकर, जालिंदर भुजबळ, दीपा गायकवाड, संजय भुरे, प्रमोद रामदासी, डॉ. सुधीर निकम, विद्या भागवत, प्रशांत तपस्वी, कस्तुरी सारंग, गौतमी देवस्थळी, विनिता संचेती, यश दौंडकर आणि ऋषिकेश बाम यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाद्वारे मराठीमध्ये प्रथमच व्हीएफएक्सचा भरपूर वापर करण्यात आला असून गिनींलाल सोलंकी यांनी व्हीएफएक्सची बाजू सांभाळली आहे. प्रविण वानखेडे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. समीर भास्कर यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून स्मिता फडके यांनी संकलन केलं आहे. प्रशांत निगोजकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत, तर संदिप इनामके कला दिग्दर्शक आहेत. सतिश सांडभोर यांनी या चित्रपटातील व्यक्तिरेखांचं कॉस्च्युम डिझायनिंग केलं असून कुमार मगरे यांनी मेकअप केला आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय गवंडे यांनी सांभाळली आहे. राशी बुट्टे या चित्रपटाचे साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत, तर मानस माळी  यांनी या चित्रपटाचं साऊंड डिझाइन केलं आहे.