भाजपच्या कार्यकर्त्यांकडून खासदार श्रीरंग बारणे यांचा निषेध

Share this News:

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना अधिकार आहे. प्रत्युत्तराला खासदार बारणे यांनीही उत्तर देऊन राजकीय सभ्यता पाळावी. परंतु,त्यांनी तसे न करता आपल्या आठ-दहा भाडोत्री कार्यकर्त्यांना पाठवून घराजवळ पुतळा जाळण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत संत तुकारामनगर प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार बारणे यांचा शुक्रवारी (दि. २६) जाहीर निषेध केला आहे.

     यासंदर्भात संत तुकारामनगर प्रभागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते रविंद्र इंगवले (मंडल अध्यक्ष, पिंपरी – दापोडी), नंदू कदम, शीतल कुंभार, बंडू जाधव, सुमीत घाटे, दिनेश पाटील, विनोद कांबळे, बाळू खाडे, दत्ता देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “लोकशाहीमध्ये कोणीही कोणावरही टिका करू शकतो. टिकेला प्रत्युत्तर देण्याचाही सर्वांना अधिकार आहे. सत्तेत सहभागी असूनही राष्ट्रवादीच्या तालावर नाचणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पत्राची दखल घेत नसल्याची टिका केली होती. ही टिका चुकीची आणि लोकांच्यामध्ये सरकारच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती. सरकारमध्ये सहभागी असलेल्या खासदारांनीच अशी खोटी टिका करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.

      खासदार बारणे यांनी कोणाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांवर टिका केली, हे जनतेला समजते. परंतु, त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे. त्यानुसार भाजपचे सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी खासदार बारणे यांचा बोलविता धनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच आमदार अजित पवार असल्याचे प्रत्युत्तर देऊन जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली. त्याला प्रत्युत्तर देण्याचा खासदार बारणे यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु, त्यांनी तसे न करता आपले काही भाडोत्री कार्यकर्ते पाठवून प्रमोद निसळ यांच्या संत तुकारामनगर येथील घरासमोर त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न म्हणजे दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. कोणतेही आंदोलन करताना राजकीय सभ्यता पाळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु, शिवसेनेने गुंडगिरी करून ही राजकीय सभ्यता पायदळी तुडविली आहे. शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्यास भाजप सक्षम आहे. परंतु, विचारांची लढाई विचारांनी लढण्याचे संस्कार भाजपवर झालेले आहेत. याचा अर्थ भाजप प्रत्येकवेळी गप्पच बसेल असे नाही.

      सत्तेची चव चाखणाऱ्या शिवसेनेने शहरातील प्रलंबित प्रश्नांवर ढोंगीपणा करू नये. खासदार बारणे यांना राज्यातील कोणताच मंत्री महत्त्व देत नाही, हे सर्वश्रुत आहे. शिवसेनेचे सुद्धा काही मंत्री आहेत. या मंत्र्यांनी शहराचे कोणते प्रश्न तातडीने सोडविले आहेत, हे सुद्धा खासदार बारणे यांनी जनतेला सांगावे. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांवर खोटी टिका करण्याचा दुटप्पीपणा करावा. खोटे पण रेटून बोलताना येथील जनता सुज्ञ आहे, याचे भान खासदार बारणे यांनी ठेवावे, अशी टिका त्यांनी केली आहे.