मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा मराठवाडा दौरा

just pune things app
Share this News:

दुष्काळी जनतेचा भ्रमनिराश करणारा-ना.धनंजय मुंडे

परळी वै.दि.05………………… मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील 25 मंत्र्यांनी केलेल्या मराठवाडा दौर्‍यामुळे दुष्काळी जनतेला कसलाही दिलासा मिळाला नसुन त्यांचा हा दौरा  भ्रमनिराश करणारा आणि केवळ दुष्काळी टुर असणाराच ठरला असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री आणि 25 मंत्र्यांनी बीड, लातुर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या केलेल्या दुष्काळी दौर्‍याच्या पार्श्‍वभुमिवर परळीत काही पत्रकारांशी संवाद साधतांना ना.धनंजय मुंडे म्हणाले की दुष्काळात होरपळुन निघणार्‍या या तीन जिल्ह्यातील जनतेला आणि शेतकर्‍यांना या दौर्‍यातुन मोठ्या आपेक्षा होत्या मात्र केवळ जुन्याच योजनांची उजळणी करीत आणि ज्या घोषणा मुंबईत बसुन करणे ही शक्य होते त्याच पोकळ घोषणा या दौर्‍यात पाहण्यास मिळाल्या. हा दौरा म्हणजे केवळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभुमिवर पार पाडलेला एक सोपस्कार ठरला आहे. काही मंत्र्यांनी दौर्‍यावर येणे टाळणे, काही मंत्र्यांनी अर्ध्या दौर्‍यातुनच निघुन जाणे, काहींनी बंद खोलीतच आढावा घेणे, देव दर्शने करून घेणे, कार्यकर्त्यांकडुन सत्कार सोहळे करून घेणे,  सोईच्या ठिकाणांची पाहणी करणे,  काहींनी रस्त्यावरच्या गावांचीच तोंड देखली पाहणी करून या दौर्‍याचे आपल्याला गांभीर्य नसल्याचे दाखवुन दिले आहे. सत्ताधारी भाजपा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि मंत्र्यांना गराडा घालुन जनते पर्यंत, शेतकर्‍यां पर्यंत पोहंचु दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकर्‍यांना दिलासा देण्या ऐवजी मित्र पक्षाच्या पदाधिकार्‍यांना पी.ए, पोलीस आणि कार्यकर्त्यां मार्फत ममप्रसादफफ देऊन गुंडगिरीचे मात्र दर्शन घडवल्याचा टोला ही त्यांनी लगावला.

शेतकर्‍यांना या दौर्‍यातुन तातडीने दिलासा मिळेल अशी एकही घोषणा या दौर्‍यात झाली नाही. कर्जमुक्तीच्या प्रमुख मागणीकडे डोळे लावुन बसलेल्या शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडले नाही, उलट मी काही देण्यासाठी आलो नाही तर योजनांची पहाणी करण्यासाठी आलो आहे असे सांगुन शेतकर्‍यांचा भ्रमनिराश केल्याचे ते म्हणाले, लातुर सारख्या सर्वाधिक पाणी टंचाईच्या गावासाठी उजणी वरून रेल्वेने पाणी आणण्याबाबत केवळ घोषणा केल्या त्याबाबत दौर्‍यात उल्लेखही नाही उलट फक्त मोठ-मोठ्या योजनांचीच घोषणा केली. आज लातुरकरांना पिण्यासाठी पाणी नाही त्यावर कसलीही उपायोजना न करता या योजना कधी पुर्ण होणार आणि पाणी कधी मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या तीन जिल्ह्यातील बीड, उस्मानाबाद, परळी, अंबाजोगाईसह सर्वच नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील लाखो नागरिकांना आणि ग्रामिण भागात आगामी तीन महिने तिव्र पाणी टंचाई जाणवणार असतांना त्याबाबतीत साधी चर्चाही होऊ नये ही दुर्देवाची बाब असल्याचे ते म्हणाले, आगामी अधिवेशनात आपण या प्रश्‍नांबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. अख्खे मंत्रीमंडळ आले असतांनाही या तीन जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र दुसरीकडे सुरूच होते यावरूनच जनतेला हे सरकार आधार देणारे वाटत नसल्याची टिका त्यांनी केली.