दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्या मान्य न झाल्यास ५ जूनला सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचा खा. शरद पवार यांचा इशारा

Share this News:

औरंगाबाद – दि.16 : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर दुष्काळी परिषद पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील १४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून १५ हजार रूपयांची मदत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते धनादेश स्वरुपात देण्यात आली. तर पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी सहाय्यता निधीचेही वाटप करण्यात आले. त्याच बरोबर यशस्विनी सामाजिक अभियान व महात्मा गांधी मिशन हेल्थ कार्डचे वाटपही २०० महिलांना करण्यात आले.

यावेळी बोलताना पक्षाध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीका करत जर सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर ५ जूनला रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

यावेळी बोलताना खा.पवार म्हणाले जे सरकार साधं पाणी आणि चारा देवू शकत नाही त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी शरम वाटली पाहिजे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत नाही . मोदींच्या अच्छे दिनाच्या भूलथापांना सर्वजण भूलले यापुढे भूलू नका, या सरकार विरोधात सर्वांनी एकजूट व्हा आणि या सरकारला धोपटून काढा. देवेंद्र आणि नरेंद्र या दोघांनाही आपण थोडा वेळ देवू जर यांनी संपूर्ण कर्जमाफी, विद्यार्थ्यांची फी माफी, गुरांना चारा, पीक कर्ज, बी बियाणे पुरवले नाही तर या सरकार विरोधात ५ जून रोजी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सरकार जरी बघ्याची भूमिका घेत असले तरी खचून जावू नका आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका लोकशाहीच्या मार्गाने या सरकारला त्यांची जागा दाखवा असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे म्हणाले सध्याचे सरकार हे नाकर्ते असून झोपेचें सोंग घेत आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी आता संघर्षा शिवाय पर्याय नाही. या सरकारला शेतकऱ्यांची कर्ज माफी करावीच लागेल. या सरकारला कर्जमाफी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाग पाडेल असा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करणार नाही याचा निर्धार करावा असे आवाहन केले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. दोन वर्षा पूर्वी १६ मे ला केंद्रात मोदींचे सरकार अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. पण दोन वर्षानंतर काय स्थिती आहे. अच्छे दिन आले का ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे १६ मे हा विश्वासघात दिन ठरला आहे अशी टिका त्यांनी केली.

तर मराठवाडा हा आता टँकरवाडा आणि स्मशानवाडा झाला असल्याची उपरोधिक टिका जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी केली. तर हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यांना शेतकऱ्यांचे काही पडले नाही अशी टिका राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. दुष्काळा बाबत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. शेतकऱ्यांना न्याय देण्याची दानत या सरकारमध्ये नाही असेही ते म्हणाले. पाण्यासाठी मराठवाड्यात ५० मुलांचा मृत्यू झाला. त्यात २० विद्यार्थी आहेत. पण त्याचे गांभिर्य सरकारला नाही असे पाटील म्हणाले.

या परिषदेच्या सुरुवातीस आमदार सतिश चव्हाण यांनी खा. शरदचंद्र पवार यांचे शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे ,विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर पाटील, माजी खा. पद्मसिह पाटील, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. राजेश टोपे, आ.विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, आदीसह पक्षाचे नेते उपस्थित होते.