महावितरणच्या थकबाकीमुक्ती योजनेला सुरवात
पुणे, दि. 03 : थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणच्या योजनेला दि. 1 नोव्हेंबरला सुरवात झाली आहे.
सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या योजनेत दि. 31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक व सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून उर्वरित उच्च व लघुदाब वीजग्राहकांना सहभागी होता येईल. राज्यात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांकडे सद्यस्थितीत सुमारे 3200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात 2649 कोटी रुपयांची मूळ थकबाकी तर 546 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे.
या योजनेत दि. 30 नोव्हेंबरपर्यंत जे थकबाकीदार ग्राहक संपूर्ण मूळ थकबाकीचा भरणा करतील त्यांना मूळ थकबाकीमधील रकमेत 5 टक्के सूट मिळणार आहे तर व्याजाची व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होणार आहे. योजनेच्या पहिल्या तीन महिन्यांत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होईल तर योजनेच्या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत मूळ थकबाकी व 25 टक्के व्याजाची रक्कम भरल्यास उर्वरित 75 टक्के व्याजाची व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होणार आहे.
मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सोय व संबंधीत ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशद्वारेही रक्कम स्वीकारली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी मूळ थकबाकीची 2 टक्के रक्कम भरण्याची अट रद्द करण्यात आली आहे. थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नजिकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
