संगणक आणि वस्तूवादाने माणसाला गुलाम केले :उत्तम कांबळे
पिंपरी, पुणे (दि. 30 एप्रिल 2018) संगणक आणि वस्तूवादाने माणसाला गुलाम केले आहे. माणसे आज अस्वस्थ आहेत, वेडेपणाची ही पहिली पायरी आहे, वस्तूने तयार केलेली तृष्णा त्याला पळायला लावते आहे, पण कुठेतरी थांबायला हवे ज्याची भूक मर्यादित त्याचे दुःख कमी हे लक्षात घेऊन जीवन जगायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी येथे केले.
चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ‘नवा भौतिकवाद आणि मरणाचे ऋतू’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी किसन महाराज चौधरी होते. यावेळी गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सचिव गजानन चिंचवडे, समन्वयक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी आहे. अशी हिंदू धर्मात धारणा आहे शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे. असे सांगितले मात्र जगात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे ही पृथ्वी संगणकाच्या स्क्रीन वर उभी आहे. असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. संगणकामुळे जग जवळ अन संगणकाच्या स्क्रीन वर आले आहे. संगणक आपल्यावर सत्ता गाजवतो आहे. आपल्याला एखादे ठिकाण शोधायचे असेल तर गूगल मॅप वर सर्च केल्यास ठिकाण येते जगण्याच्या कोणत्याही क्षेत्रातील उत्तरे संगणकावर शोधली जात आहेत. पिंडाला कावळा शिवत नसेल तर मृत व्यक्तीचा मुलगा मोबाईल वर घाटावर संपर्क साधतो असे कांबळे म्हणाले.
येत्या काही दिवसात क्लोन जन्माला घालण्याची परवानगी मिळाली तर प्रेम, लग्न, याची गरजच लागणार नाही. असे सांगून कांबळे म्हणाले की, अनेक देशांनी रोबोट तयार केले आहे. काही देशांनी नागरिक म्हणून रोबोट ला मान्यता ही दिली आहे. गुंतागुंतीचे ऑपरेशन रोबोट द्वारा केले जात आहे. जगाचे वैश्विकरण झाल्याने वस्तूंचा प्रवास सुखकर झाला आहे. अमेरिकेतील उत्पादित वस्तू सोळा तासात भारतात येते. माणसाआड कायदे येतात वस्तूआड येत नाही. आता ऑनलाईन लर्निंगही येत आहे. तुम्ही पुढारलेले की मागासलेले हे तुम्ही कोणत्या ब्रँडची वस्तू वापरता यावर ठरविले जात आहे. वस्तू उत्पादनांचा वेग वाढला आहे. ग्राहक पकडण्यासाठी मीडियाला वस्तू विक्रीचे साधन केले आहे. मोबाईल खरेदी केल्यास त्याचे कव्हर, स्क्रीन गार्ड, टीव्ही बरोबर स्टॅन्ड, पडदा, वॉशिंग मशीन घेतल्यास लिक्विड अशा वस्तू समूह करून येतात माणूस गेला तर विम्याची रक्कम मिळायला वेळ लागतो. मात्र मोबाईल हरवला तर चोवीस तासात पैसे मिळतात माणसाचे हक्काचे अधिकार वस्तूच्या पोटात गेले आहेत. वस्तू पुढे माणूस दुर्बल झाला आहे, असे कांबळे म्हणाले.
आज ऑनलाईन घरपोच वस्तू मिळत आहेत. जिकडे तिकडे मॉल्स झाले आहेत. मात्र वस्तू विकत घेण्याची क्षमता प्रत्येकाकडे नाही. त्यातून आहे रे आणि नाहि रे अशी विभागणी झाली आहे. माणसात या पूर्वी पारंपरिक भेद होतेच आता पिझ्झा खाणार पुढारलेला तर बाजरीची भाकरी खाणारा तो मागासलेला बिसलेरीचे पाणी पिणारा पुढारलेला आणि साधे पाणी पिणारा मागासलेला असे भेद तयार झाले. आज माणूस आणि माणूस लढाई होत असली तरी भविष्यात संगणक विरुद्ध माणूस अशा लढाया होतील शोकसभेत संगणक भाषण करतील असे कांबळे यांनी सांगितले.
मोबाईल मुळे आज दोन माणसांची गळाभेट होत नाही संवाद हरवत चालला आहे, कोणाकडे कोणता ब्रँड यावरून त्याचे मोठेपण ठरविले जात आहे. अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली. ज्या समाजात माणसाची किंमत वस्तूवरून ठरते तो समाज अंधाराच्या दिशेने जातो असे ते म्हणाले.
मानवी जीवनाच्या प्रत्येक हालचालींचे वस्तू आणि भांडवलात रूपांतर झाले आहे. जगण्याला जे जे लागते त्याची इंडस्ट्री झाली आहे. अन विचारांची इंडस्ट्री संपली आहे असे कांबळे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येबद्दल कांबळे यांनी चिंता व्यक्त केली. भारतातील शेतकरी शेतीला उद्योग समजत नाहीत. प्रयोग करत नाहीत देवावर भरवसा ठेवतो स्टोरेज मार्केटिंग यात तो मागे पडत आहे. मोठ्या कंपन्या शेती उद्योगात उतरल्या आहेत त्यांच्याशी तो स्पर्धा कशी करणार आपणही इतर वस्तूंसाठी कुरकुर न करता पैसे मोजतो मात्र शेती उत्पादनाबाबत बार्गेनिंग करतो अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली.
तरुणांना आज मोठ्या प्रमाणात स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. क्षेत्रे, मैदाने खुली आहेत पण विषम फाइट आहे. जिंकणार कोण हे आधीच ठरत मॅच फिक्सिंग असते या नैराश्यातून मुले आत्महत्या करतात पालक मुलांचा मेंदू कुरतडतात रॉन्ग नंबर, स्पीड ब्रेकर याचे भान पालकांना राहात नाही असे कांबळे म्हणाले.
सुहास पोफळे यांनी आभार मानले.
