Elderly woman rescued by Fire Brigade
धुरामधे अडकलेल्या जेष्ठ महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका
पुणे – कोथरुड, रामबाग कॉलनीतील तारांगण सोसायटी येथील तीन मजली इमारतीत आज दुपारी दिड वाजता बेसमेंटमधे असणाऱ्या मीटर बॉक्सने पेट घेतल्याने आगीची घटना घडली. या आगीच्या तीव्रतेमुळे पुर्ण इमारतीत धुराचे लोट पसरल्याने स्थानिक रहिवाशी अडकल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली होती.
अग्निशमन दलाने घटनेचे स्वरुप पाहता एरंडवणा अग्निशमन केंद्रातील वाहन तातडीने रवाना केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच काही जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला तर दुसरीकडे इतर जवानांनी इमारतीत राहणाऱ्या सुमारे 15/20 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यास सुरवात केली. त्याचवेळी जवानांना एक जेष्ठ महिला मंगला आगरकर (वय ८४) यांना धुरामुळे त्रास होत असून त्या दुसऱ्या मजल्यावर असल्याचे समजले. त्याचवेळी तत्परतेने जवान किशोर बने यांनी मंगला आगरकर यांना इतर जवानांच्या साह्याने उचलून खाली आणले. खाली आल्यानंतर आगरकर यांनी सुटकेचा आनंद मानत अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. त्याचवेळी विद्युत मंडळाचे कर्मचारी ही दाखल होऊन आग विझल्याची नोंद घेऊन धोका नसल्याची खात्री करत अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळ सोडले.
सदर कामगिरीमधे एरंडवणा अग्निशमन केंद्राचे जवान ज्ञानेश्वर खेडेकर, किशोर बने, कोंडिबा झोरे, प्रविण रणदिवे तर देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे हेमंत कांबळे, शुभम गोल्हार, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.