दापोडीतील साहिल सय्यदची टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात निवड 

Sahil Sayyed cricket
Share this News:
पिंपरी । प्रतिनिधी :  येत्या 28 ते 31 मार्च दरम्यान भारत व बांग्लादेशमध्ये इंटरनॅशनल व्हीलचेअर क्रिकेट सिरीज ही ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांची मालिका होत आहे. ही मालिका मुंबई आणि गोवा येथे होत असून, या मालिकेसाठी दापोडीतील साहिल सय्यद या 90 टक्के अपंगत्व असलेल्या तरुणाची इंडियन व्हीलचेअर क्रिकेट संघात निवड झाली आहे.
            नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील या 22 वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट खेळामध्ये चमक दाखविली आहे. या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, मॅन ऑफ द मॅच असा बहुमान मिळवला आहे. सध्या तो महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळत आहे. केवळ जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर साहिल मार्गक्रमण करीत आहे. साहिलच्या या निवडीचे स्वागत होत आहे. मुंबई आणि गोव्यात पार पडत असलेल्या या मालिकेसाठी साहिल मुंबईला रवाना झाला असून, दोन दिवस त्यांचे तिथे सराव सामने आहेत.
             साहिल सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसला, तरी या मुलांप्रमाणे त्याच्या आवडीनिवडी, महत्त्वाकांक्षा आहेत. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड. विशेषत: क्रिकेटची. पण वडिलांना वाटे की तो कसा क्रिकेट खेळू शकेल ? पण साहिल मित्रांना जमवून चांगले क्रिकेट खेळू लागला. त्यामुळे वडिलांनी त्यासाठी हवे ते सर्व साहित्य त्याला घेऊन दिले. साधारणत: तो दहा वर्षाचा असताना क्रिकेट चांगला खेळू लागला. त्यानंतर त्याला आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. साहिलचे वडील सलीम दादाभाई सय्यद हे भारतीय सैन्यदलात आक्रमक 11 मराठा बटालियनमध्ये होते. त्यांनी 20 वर्षे सेवा भारतमातेची सेवा केली. ते सैन्यदलात कार्यरत असल्याने साहिलची संपूर्ण जबाबदारी आई शबनम यांच्यावर होती. त्यांनीही न डगमगता साहिलच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आजोबा तय्यब जमादार यांचाही या यशात मोठा वाटा आहे.
        सरावाने साहिल क्रिकेटमध्ये इतका पारंगत झाला, की जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये त्याने आपली चमक दाखविली. त्याच्या कौशल्याची दखल घेत त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. त्यामध्ये तो उत्कृष्ट खेळतो आहे. मेरठ येथे पार पडलेल्या इंडियन व्हिलचेअर क्रिकेट लीग स्पर्धेत महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात साहिलला ‘मॅन ऑफ द मॅच’चा बहुमान मिळाला होता. बांग्लादेश क्रिकेट दौर्‍यासाठीही साहिलची संघात निवड झाली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्याला या दौर्‍याला जाता आले नाही. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साहिलची घोडदौड सुरु आहे. आता मुंबई आणि गोव्यात होत असलेल्या मालिकेत आम्ही सरस कामगिरी करीत विजयश्री खेचून आणू, असा विश्वास साहिलने व्यक्त केला.
साहिलला क्रिकेटबरोबरच अ‍ॅथलेटिक (गोळा फेक), पॉवरलिफ्टिंग खेळाची आवड असून, यामध्येही त्याने नैपुण्य मिळविले आहे. अ‍ॅथलेटिकमध्ये त्याने सुवर्णपदक, पॉवरलिफ्टिंगमध्ये सिल्वर मेडल मिळविले आहे.
           आईमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. मला बाहेरगावी विविध स्पर्धांच्या निमित्ताने नेहमीच जावे लागते. या प्रवासाची जबाबदारी छावा मराठा संघटनेचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष राम जाधव उलचत असतात. तसेच अगदी दैनंदिन जीवनातही काही अडचण आली, मदत लागली तर राम जाधव धावून येतात. प्रहार अपंग आंदोलन संघटनेच्या सातारा अध्यक्षा सुरेखा सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरत आहे.
-साहिल सय्यद, क्रिकेटर