Alandi to get 2 lakh litre water everyday

Share this News:

तीर्थक्षेत्र आळंदीला ‘पीसीएमसी’चे पाणी!

– दररोज दोन लाख लीटर पाणीपुरवठा  

– आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला  दररोज दोन लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयक्त श्रावण हार्डीकर यांनी घेतला आहे. 

     गेल्या काही दिवसांपासून आळंदीकरांना दुषित पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीसाठी पिण्यासाठी पाणी पुरवठा करावा. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा सुरु केला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर आणि आमदार लांडगे यांची बैठकही झाली होती.

       आळंदी आणि परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे आळंदीकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इंद्रायणीच्या प्रदूषणात वाढ झाली. तेच पाणी पुढे आळंदीत बांधलेल्या बंधा-यामध्ये जाते. या पाण्यावर प्रक्रिया करुन नगरपरिषद आळंदीकरांना पुरवठा करीत आहे. मात्र, पाणी प्रक्रिया प्रकल्प सदोष असल्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याला महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

       पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणीपुरवठा केला जाते. त्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त शिल्लक कोट्यातून महापालिका आळंदीला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की,  भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महापालिका ५ एमएलडी पाणी देणार आहे. मात्र, आळंदीचा भविष्यातील विस्ताराचा विचार करुन कुरळी येथील पंपिंग स्टेशनमधून १५ एमएलडी पाणी आळंदी शहराला मिळावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक घेण्यात घेण्यात येणार आहे.