बारामती परिमंडलामध्ये महावितरणच्या जागेत 9575 किलोवॅटचे 11 सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण

Share this News:

बारामती, दि. 20 जुलै 2019 : कृषिपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी  ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजने’ला गती देण्यात आली असून बारामती परिमंडल अंतर्गत महावितरणकडून स्वतःच्या उपकेंद्रांच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या 9575 किलोवॅट (9.5 मेगावॅट) क्षमतेचे 11 सौर उर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

 

बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 3185 किलोवॅटचे चार प्रकल्प तर बारामती मंडलमध्ये 3643 किलोवॅटचे पाच सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी व चाचणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत हे नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत तर सातारा जिल्ह्यात 2747 किलोवॅटचे दोन प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित झाले आहे. हे सर्व प्रकल्प महावितरणने 33/11 केव्ही उपकेंद्रांच्या जागेत उभारलेले आहेत.

 

राज्यातील एकूण वीज वापरातील 30 टक्के विजेचा वापर कृषिक्षेत्रासाठी होत आहे. कृषिपंपांना सद्यस्थितीत दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जातो. राज्यातील शेतकऱ्यांची दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी आहे. परंतु वीज वितरण यंत्रणेतील वहन क्षमतेचा समतोल राखण्यासाठी एकाच वेळी राज्यातील सर्वच कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र शासनाने दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. अशा प्रकारची योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेमुळे कृषिपंपांना दिवसा व माफक दरात शाश्वत वीज उपलब्ध होणार आहे. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्यासंयुक्त सहकार्याने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून शासकीय, गावठाण, शेतकऱ्यांच्या खडकाळ व पडीक जमिनी आदी ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी सुरु आहे. यासोबतच महावितरणकडून देखील सौर उर्जा प्रकल्पांची उभारणी सुरु असूनबारामती परिमंडलामध्ये 11 उपकेंद्रांच्या जागेवरील प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

 

सोलापूर जिल्ह्यामध्ये कुंभारी (ता. सोलापूर) – 1414, शिरवळ (ता. अक्कलकोट) – 509 तसे

 

च पंढरपूर लिंक रोड – 592 व बंदी शेगाव – 670 किलोवॅट (ता. पंढरपूर) असे एकूण 3185 किलोवॅटचे चार सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झालेआहेत. सातारा जिल्ह्यातील वाई एमआयडीसी – (ता. वाई) 748 व तळबीड (ता. कराड) -1999 किलोवॅट असे एकूण 2747 किलोवॅटचे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर बारामती मंडलातील सुपा – 821 व होळ – 1027 (ता. बारामती),निमगाव केतकी – 605 व रेडणी – 630 (ता. इंदापूर) आणि दहिटणे (ता. दौंड) – 560 असे एकूण 3643 किलोवॅटच्या पाच सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली आहे.