Electricity resumes in Bundgarden, Wadi college areas

Share this News:

येरवड्यामधील महापालिकेच्या खोदकामात

महावितरणच्या 7 वीजवाहिन्या पुन्हा तुटल्या

वाडिया, बंडगार्डन परिसरात पुन्हा भारनियमन

पुणे, दि. 11 : पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात तुटलेल्या येरवड्यामधील चार वीजवाहिन्यांची दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या 12 तासांतच त्याच खोदकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाणी व सुरु असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी (दि. 11) पहाटे चारच्या सुमारास पुन्हा सात वीजवाहिन्या तुटल्या. परिणामी वाडिया व बंडगार्डन परिसरात विजेच्या भारव्यवस्थापनासाठी तीन तासांचे चक्राकार पद्धतीने दिवसभर भारनियमन करावे लागले. दरम्यान, खोदकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यामधील डॉ. आंबेडकर चौकात पुणे महानगरपालिकेकडून पावसाळी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीने खोदकाम काम सुरु आहे. मंगळवारी (दि. 9) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास या खोदकामात चार वीजवाहिन्या तुटल्याने वाडिया व बंडगार्डन परिसरात भारनियमन करावे लागले होते. याशिवाय विश्रांतवाडी परिसरातील काही भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. या तुटलेल्या चारही वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम बुधवारी (दि. 10) दुपारी अडीच वाजता पूर्ण झाले. त्यानंतर नायडू उपकेंद्गातून वाडिया व बंडगार्डन परिसरातील वीजपुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात आला होता.

परंतु अवघ्या 12 तासांच्या कालावधीनंतर येरवड्यामधील त्याच खोदकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी वाढल्याने व सुरु असलेल्या खोदकामामुळे आज पहाटे 4 वाजता पुन्हा सात वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे नायडू उपकेंद्गातून वीजपुरवठा होणार्‍या जहॉगिर हॉस्पीटल, रुबी हॉस्पीटल, कॉनरॅड हॉटेल, ताडीवाला रोड, ढोले पाटील रोड, मंगलदास रोड, नालोर रोड, प्रायव्हेट रोड, आरटीओ ऑफीस परिसर, लडकतवाडी, सोहराब हॉल, बंडगार्डन रोड, बोट क्लब रोड आदी परिसरातील 9 हजार वीजग्राहकांना फटका बसला. या परिसरात आज पुन्हा तीन तासांच्या चक्राकार पद्धतीचे भारनियमन करावे लागले. 

रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रय साळी यांनी आज दिवसभर तेथे उपस्थित राहून दुरुस्ती काम सुरु केले. या वीजवाहिन्यांची दुरुस्ती आज मध्यरात्रीनंतर पूर्ण होईल. या सर्व प्रकारात महावितरणचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे महानगरपालिकेच्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध महावितरणकडून येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

महावितरणच्या कर्मचार्‍यास मारहाण – येरवड्यामधील पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. या वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना लाईट का घालविली अशी विचारणा करून महावितरणचे जनमित्र निवृत्ती साबळे यांना धक्काबुक्की व शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

वडगाव, धायरी, नांदेडमधील वीजपुरवठा सुरळीत – वडगाव ब्रिज येथे बुधवारी (10) महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ साठवलेल्या कचऱ्याने पेट घेतल्यानंतर पाच वीजवाहिन्या जळाल्या होत्या. या वाहिन्यांची आज पहाटे दीड वाजताच्या सुमारास दुरुस्ती पूर्ण झाली. परंतु वीजयंत्रणेजवळ टाकलेल्या कचऱ्याच्या आगीचा फटका वडगाव, धायरी गाव, नांदेड गाव व सिंहगड रस्त्यावरील सुमारे 25 हजार वीजग्राहकांना बसला व वीजपुरवठ्याअभावी त्यांची गैरसोय झाली होती.