Govt committed to resolve farmers’ issues – Mahesh Landge

Share this News:

​शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार कटीबद्ध!

– आमदार महेश लांडगे यांचा विश्वास

– सातारा जिल्ह्यात शिवार सभांचा धडाका
पुणे – केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतीच्या विकासासाठी दूरदृष्टीने विविध योजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील शेतक-यांच्या समस्या सोडविण्यात भाजप सरकार कटीबद्ध आहे, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले.

भाजपतर्फे राज्यभर शिवार सभा सुरु आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनीही गुरुवारपासून सातारा जिल्हयातील महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा  तालुक्यातील शेतक-यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, भाजपच्या विविध योजनांची माहिती शेतक-यांना दिली. यावेळी माजी खासदार गजानन बाबर, भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष रामदास शिंदे, खंडाळा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश देशमुख, वाई तालुका भाजप अध्यक्ष सचिन घाडगे, जयंत पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील पसरणी, चिखली, आरवली, वायगाव, बलकवडी, परतवडी, कोंडवली, आकुशी, वासुळे, वेलंग, चिंदवली आणि भोईंज आदी गावांतील शेतक-यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

भाजपतर्फे दि. २५ ते २८ मे असे चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होणार आहेत. भाजपचे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदानही करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिलला भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप करताना पिंपरी चिंचवड येथे शेतकरी संवाद सभांच्या उपक्रमाची घोषणा केली होती. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे या सभांचे नियोजन करीत आहेत. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरूवारी, एकाच दिवशी चार हजार गावांमध्ये सकाळी दोन व सायंकाळी दोन अशा चार हजार सभा होणार आहेत. हा उपक्रम रविवार, २८ मे रोजी पूर्ण होईल. प्रत्येक गावातील शेतक-यांशी भाजपाचे लोकप्रतिनिधी संवाद करणार आहेत.

आमदार महेश लांडगे म्हणाले की,  केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची पूर्ण माहिती व्हावी तसेच वंचित शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा म्हणून भाजपातर्फे ही संवाद मोहीम होत आहे. या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करीत आहोत. शेतक-यांच्या अपेक्षा राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्याची माझी जबाबदारी आहे. महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील शेतक-यांच्या अपेक्षांचा अहवाल राज्य सरकारला पाठविणार आहे.

————

काय आहेत शेतक-यांच्या अपेक्षा?

– शेतक-यांच्या मालाला हमीभाव द्यावा.

– शेती वीजपंपासाठी अनुदान मिळावे.

– शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा व्‍हावा.

– शेतक-यांना किमान १ लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी.

– ‘जल लक्ष्मी’ योजनेत सुधारणा करण्यात यावी.

– शेती सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्‍हावेत.

– शेतक-यांना वीजजोड वेळेत मिळावेत.

– हळदीच्या पिकाला हमीभाव मिळावा. 

– ठिबकचे थकीत अनुदान त्वरित द्यावे.