Gunhegaarancha Kardankal, Sherdil Shailesh Jagtap

Share this News:

गुन्हेगारांचा कर्दनकाळ, शेरदिल पोलिस शैलेश जगताप

शैलेश हरिभाऊ जगताप… पोलिस खात्यात मोठ्या आदरानं आणि प्रेमानं घेतलं जाणारं नाव. फक्त पुण्यातच नाही, तर महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. एकदम निर्भिड, जबरदस्त तंदुरुस्त, अत्यंत देखणा आणि धडाकेबाज असा पोलिस .दंडावर काढलेला ‘टॅटू’ मिरविण्याची भारी हौस असलेला ‘टॅटूप्रेमी’. ज्याचं नाव ऐकताच पुण्यातील भले भले गुंड चळाचळा कापतात.

सध्या गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेल्या शैलेश जगताप यांनी अनेकांच्या हृदयामध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. मग ते वरिष्ठ पोलिस अधिकारी असोत किंवा गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची माहिती पुरविणारे छोटे-मोठे गुन्हेगार असोत. प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्ट जगताप यांच्याशी अगदी सहजपणे ‘शेअर’ करतो. अशाच माहितीच्या आधारे त्यांनी करिअरमध्ये अनेक गुन्ह्यांची उकल करून श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. पोलिस दलांमध्ये १९९१मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पोलिस दलातील अधिकाऱ्यांप्रमाणेच समाजाच्या विविध स्तरातील नागरिकांनीही त्यांचे अनेकदा तोंडभरून कौतुक केलेले आहे.

जगताप यांना पोलिस दलाचा मोठा वारसा आहे. त्यांच्या मातोश्री देखील पोलिस दलामध्ये सेवेस होत्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यामुळे पोलिस दलासाठी आवश्यक अशी सर्व कौशल्ये आणि गुण जगताप त्यांच्या रक्तातच आहेत. जन्मतःच त्यांना वारसा हक्काने ते प्राप्त झाले. लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीचा आणि देशासाठी सर्वस्व बलिदान करण्याची तयारी ठेवण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये भिनत गेली. आईच्या करड्या शिस्तीत आणि मार्गदर्शनाखाली एक आदर्श पोलिस  घडत गेला.

पोलिस दलातील दोन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये जगताप यांनी अनेक शिखरे पादाक्रांत केली. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. नागरिकांचे जगणे अधिक सुरक्षित व्हावे, यासाठी ते अहोरात्र झटत होते. प्रामाणिकपणा, मनापासून केलेले कष्ट आणि कठोर मेहनत यांच्या जोरावर त्यांनी अनेक अवघड आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि गुन्हेगारांच्या मनोवृत्तीचा अभ्यास या जोरावर शैलेश जगताप सातत्याने पुढे जात राहिले.

शैलेश जगताप यांच्या नावावर एक आगळीवेगळी कामगिरी नोंदली गेली आहे. पोलिस दलामधील ते असे एकमेव अधिकारी आहेत, ज्यांनी कुख्यात गुन्हेगारांकडून आतापर्यंत १७४ पिस्तूल जप्त केल्या आहेत. तसेच ४००हून अधिक जिवंत स्फोटकेही ताब्यात घेतली आहेत. आपल्या या कामगिरीचे सर्व श्रेय माझे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे आहे, असे जगताप मोकळेपणानं कबूल करतात. मला प्रत्येक वेळी त्यांनी सहकार्य केले आणि प्रोत्साहन दिले, त्यामुळेच मी येथवर पोहोचू शकलो, असे ते प्रामाणिकपणे मान्य करून टाकतात.

जागतिक बाजारपेठेत एक कोटी रुपये किमतीची बंदी घातलेली मादक द्रव्ये जगताप यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आली आहे. कोकेन, एलएसडी, क्रिस्टल मेथामफेटामाइन आणि एक्स्टसी पिल्स असे अनेक बंदी घातेलले मादक पदार्थ कारवाईमध्ये जप्त करण्याची कामगिरी जगताप यांनी पार पाडली. गुन्हेगारांचा फडशा पाडण्यासाठी झालेल्या एका ऑपरेशनमध्ये गुन्हेगारांनी त्यांच्यावर तुफान गोळीबारही केला होता. त्यालाही जगताप यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते.

स्वतःच्या गाडीवर लालदिवा लावून सरकारी अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या भामट्याविरुद्धची कारवाई, खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना केलेली अटक, संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी राबविलेली मोहीम, हरणांची कातडी जप्त करण्यासाठी लावलेला सापळा, चोरीच्या वाहनांचा तपास आणि फरार गुन्हेगारांची धरपकड अशी विविध प्रकारची कामगिरी शैलेश यांनी पार पाडलेली आहे. अनेक विभागांमध्ये काम केल्यामुळे सर्वंकश अनुभवाच्या जोरावर ते अष्टपैलू अधिकारी म्हणून ओळखले जातात. धडाकेबाज कामगिरीमुळे ते नेहमीच मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये झळकत असतात. माध्येमही त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन योग्य ती प्रसिद्धी देत असतात. काम करताना झोकून देण्याची वृत्ती आणि व्यावसायिकता यांच्यामुळे जगताप यांचे वरिष्ठ अधिकारीही नेहमीच त्यांच्या पाठीवर कौतुकाची शाबासकी देतात.  

सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमुळे नुकतेच ते पुन्हा एकदा चर्चेत आले. सापाच्या विषारी तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त करून पोलिसांनी दोन कोटी रुपये किंमतीचे सापाचे विष जप्त केले. या प्रकरणी काही नायजेरियन गुन्हेगारांना अटक करण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

पोलिस दलांमध्ये नव्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच समाजातील तरुण पिढीसाठी शैलेश जगताप यांचा आतापर्यंतचा प्रवास मार्गदर्शक असाच आहे. अर्थात, आपल्या राष्ट्रासाठी एका सच्च्या देशभक्त नागरिकाने निभावलेले कर्तव्य आहे, अशीच जगताप यांची भावना आहे.