Will curb crime in Pimpri-Chinchwad : Rashmi Shukla

Share this News:

 

पिंपरी- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही पोलीस कर्मचा-यांना मदत करुन शहर गुन्हेगारीमुक्त करावे, असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पोलीस आयुक्त शुक्ला यांनी मंगळवारी भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. या दौ-यात चिखली येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेचीही पाहणी करण्यात आली.

यावेळी आमदार महेश लांडगे यांच्यासह महापौर नितीन काळजे, सहपोलीस आयुक्त सुनिल रामानंद, अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अजय भोसले, तसेच क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक संजय नेवाळे, कुंदन गायकवाड, राहुल जाधव, सारिका बो-हाडे, राजेंद्र लांडगे, सोनाली गव्‍हाणे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त शुक्ला यांनी या पाहणी दौ-यात एमआयडीसी पोलीस ठाणे, दिघी पोलीस ठाण्याची पाहणी केली. शुक्ला म्हणाल्या की, चिखली येथील नियोजित पोलीस ठाण्याचे काम आगामी १० तारखेपर्यंत पूर्ण करण्यात यावे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच, १० ते १५ तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेवून नवीन पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच, पोलीस ठाण्याचे काम पूर्ण होईपर्यंत लक्ष्मी रोड, चिखली येथील प्रथामिक शाळेची पर्यायी जागा म्हणून पाहणी करण्यात आली आहे.