Huge ABVP rally in Pune
अभाविपची पुण्यात विराट ‘छात्रक्रांती’
पुण्यातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या विविध रास्त मागण्यांसाठी अभाविप पुणे महानगरातर्फे आज शनिवारवाडा ते विधानभवन असा छात्रक्रांती मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील शैक्षणिक स्थिती पाहता विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.
अनेक महाविद्यालयात पायाभूत सुविधा नाहीत, अनधिकृतपणे शुल्क घेऊन विद्यार्थ्यांची लूट होते, पेपर तपासणीत असंख्य घोळ होतात, निकाल वेळेवर लागत नाहीत, पुनर्मुल्यांकनाचा निकाल बरेचदा पुढील परीक्षेनंतर लागतो, शिष्यवृत्ती व EBC वेळेवर मिळत नाही. यासोबतच स्पर्धा परीक्षांबाबतीतही अनेक समस्या आहेत. खाजगी आणि अभिमत विद्यापीठात विद्यार्थ्यांची सर्रास लूट चालू आहे. तंत्रनिकेतन, ITI, Medical व कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अशा अनेक समस्यांविरोधात आज अभाविप पुणे महानगराने हा छात्रक्रांती मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा, कनिष्ठ महाविद्यालय, कला, विज्ञान, वाणिज्य, पी. एच. डी. या सर्व क्षेत्रातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
या मोर्चाचा समारोप विधानभवन येथे झाला. यावेळी अभाविपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मोर्चातील विविध शैक्षणिक समस्यांबाबतचे निवेदन दिले. अभाविपच्या शिष्टमंडळाकडून या सर्व मागण्यांबाबत पाठपुरावा केला जाईल असे सांगण्यात आले व या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.