MLA Mahesh Landge pledges all round development of Alandi

Share this News:

आळंदीच्या सार्वांगीण विकासासाठी कटीबद्ध!

– आमदार महेश लांडगे यांचे ‘वचन’
– आळंदीकर मतदारांचे मानले आभार

आळंदी – लाखो वारक-यांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीच्या सार्वांगीण विकासासाठी भाजप सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असे ‘वचन’ तमाम आळंदीकरांना आमदार महेश लांडगे यांनी दिले.
आळंदी नगरपरिषदेच्या ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व निर्माण केले आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या वैजयंता उमरगेकर विजयी झाल्या आहेत. एकूण १८ जागांपैकी भाजपचे १०, शिवसेनेचे ५ आणि अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, अपक्ष २ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ आता १२ इतके झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील महत्वाची मानली जाणारी आळंदी नगरपरिषद निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी नगरपरिषद भाजपच्या ताब्यात असावी, अशी अपेक्षा आमदार लांडगे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार आमदार लांडगे यांनी तालुकाअध्यक्ष अतुल देशमुख आणि प्रमुख पदाधिका-यांच्या मदतीने आळंदी पिंजुन काढली होती. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून सत्ता खेचून घेणे, भाजपला शक्य झाले आहे. यापूर्वी आळंदी नगरपरिषदेत शिवसेना आणि अपक्षांचे वर्चस्व होते. भाजपच्या विजयामुळे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे यांना चांगलाच धक्का बसला आहे.
————-
विजयाचे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांचे…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून श्रीक्षेत्र आळंदीचा विकास रखडला आहे. कोणत्याही भावणिक मुद्यांच्या आधारे नव्‍हे, तर विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. खरं तर आमचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तेव्‍हाच विजय दृष्टीक्षेपात दिसत होता. भाजपविरोधी आघाडी करुन विरोधकांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. मात्र, मतदारांनी आम्हाला पसंती दिली. त्यामुळे आळंदीतील सूज्ञ  मतदारांचे प्रथम आभार मानतो. तसेच, हा विजय केवळ माझा नाही, आमचे सहकारी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, नगरसेवक संदीप (बच्चन) रासकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रामाणिक कष्ट केले आहेत. त्यामुळे या विजयाचे श्रेय आळंदीतील तमाम भाजपप्रेमी आणि विकासाच्या वाटचालीवर विश्वास ठेवणा-या मतदारांचे आहे.