MSEDCL disconnects electricity of 15,000 defaulters

Share this News:

दहा दिवसांच्या कारवाईत 15 हजार
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2017 : थकबाकीदारांविरोधात महावितरणकडून सुरु असलेल्या कारवाईत गेल्या 10 दिवसांत 14,830 ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर 30,388 ग्राहकांनी 15 कोटी 16 लाख रुपयांच्या थकीत देयकांचा भरणा केला आहे.
घरगुती, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांनी दरमहा येणारे वीजदेयके दिलेल्या मुदतीत भरणे अपेक्षीत असताना गेल्या दोन-तीन महिन्यांत प्रामुख्याने लघुदाब वीजग्राहकांकडे थकबाकी वाढत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार पाठपुरावा करुनही थकबाकी व चालू देयके न भरणार्‍या थकबाकीदारांविरोधात महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार गेल्या 10 दिवसांत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 9 कोटी 6 लाख रुपयांच्या थकीत वीजदेयकांपोटी 13,268 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर 23,177 थकबाकीदारांनी 9 कोटी 8 लाख रुपयांच्या देयकांचा भरणा केला आहे. तसेच खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतही 3 कोटी 32 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे 1,562 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर 7,211 थकबाकीदारांनी 6 कोटी 7 लाख रुपयांच्या देयकांचा भरणा केला आहे.
थकबाकीदारांविरोधात सुरु असलेल्या धडक मोहिमेत मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांसह पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. याशिवाय थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिसांचे सहकार्य घेण्यात येत आहे. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच थकबाकीच्या वसुलीमध्ये हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे दिले आहेत.
महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु केलेली मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देयकांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्वरित निराकरण करण्याची सूचना उपविभाग कार्यालयांना देण्यात आली आहे. थकीत देयकांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्ग तसेच घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.