विद्यार्थ्यांना घरूनही अभ्यास करता यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘ई-कंटेन्ट पोर्टल’

Share this News:

• एक हजाराहून अधिक शैक्षणिक व्हिडिओ, पीपीटी, लेक्चर्स उपलब्ध

• इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही लाभ घ्यावा; कुलगुरूंचे आवाहन

पुणे – कोरोना विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी, त्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्याकरिता विद्यापीठाने त्यांना घरून अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विद्यापीठातर्फे ‘ई-कंटेन्ट पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची लेक्चर्स, नोट्स, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तसेच, १००० हून जास्त व्हिडिओ ठेवण्यात आले आहेत. त्यात दिवसेंदिवस भर टाकली जात आहे. त्याचबरोबर शिक्षकांनाही, व्हाट्सअप, ई-मेल, गुगल क्लासरूम व इतर ई-माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी याबाबत विद्यापीठातील विविध विभागांचे शिक्षक तसेच, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्था यांच्या शिक्षकांसाठी आदेश काढले आहेत.

याबाबत प्रा. करमळकर यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचे शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वेबसाईटच्या होम पेजवर स्वतंत्र वेब-लिंक सुरू करण्यात आली आहे. त्यावर विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ई- कंटेन्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय शिक्षकांनाही त्यांच्या विषयाची लेक्चर्स, नोट्स, प्रेझेंटेशन, व्हिडिओ किंवा तत्सम ई-कंटेन्ट उपलब्ध करून देण्याबाबत सांगण्यात आले आहे. आतापर्यंत १००० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. अधिकाधिक साहित्य अपलोड करण्याचे काम सुरूच राहणार आहे. यामुळे सुट्टीच्या काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करणे शक्य होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गोष्टींशी जोडून ठेवता येईल.

या काळात शिक्षकांनी घरून काम (वर्क फ्रॉम होम) करणे अपेक्षित आहे. त्यांनी व्हाट्सअप, ईमेल, स्लाईड शेअर, गुगल क्लासरूम अशी माध्यमे वापरून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती पोहोचवावी आणि आवश्यक ते मार्गदर्शन करावे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना असलेल्या सुट्टीच्या काळात त्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करता येईल.

याशिवाय विद्यापीठाच्या आवारात राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत (रुसा) ‘ई-कंटेन्ट’ निर्माण करण्यासाठी अद्ययावत स्टुडिओची सुविधा उभारण्यात आली आहे. त्याचा उरपयोग करूनही शिक्षण ई-कंटेन्ट तयार करू शकतात, असेही कुलगुरू प्रा. करमळकर यांनी सांगितले.

*उत्तम प्रतिसाद व भरपूर ई-कंटेन्ट*
कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी केलेल्या आवाहनाला विद्यापीठातील सर्व विभाग, त्यातील शिक्षक तसेच, महाविद्यालयांमधील शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे चारही विद्याशाखांमधील सर्वच विषयांचे शैक्षणिक ई-कंटेन्ट मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

*विद्यापीठात ई-कंटेन्टची निर्मिती दहा वर्षांपासून*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘एज्युकेशनल मल्टिमीडिया रीसर्च सेंटर’च्या (ईएमएमआरसी) माध्यमातून ई-कंटेन्टची निर्मिती सुमारे दहा वर्षांपासून होत आहे. ते यूसीजीच्या अंतर्गत असलेल्या ‘कन्सोर्शियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन’ (सीईसी) या विभागाच्या सहकार्याने केले जात होते. हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना ई-प्लॅटफॉर्मवर उपलब्धही करून देण्यात येत होते. आता कोरोना विषाणू संसर्गाच्या निमित्ताने ते सीईसीच्या परवानगीने विद्यापीठाच्या मुख्य संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. विद्यापीठातील ‘ईएमएमआरसी’कडे देशभरातील सर्व २७ केंद्रांवरील शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. ते तब्बल ८७ विषयांशी संबंधित आहे. हे साहित्य आता विद्यापीठाच्या बेवसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

*इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- कुलगुरू*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या या ई-कंटेन्टचा सर्व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील तसेच, देशातील सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक ई-कंटेन्ट पोहोचवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्माण केलेले शैक्षणिक साहित्य आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबरच इतरांनाही उपयोगी ठरेल. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असेही प्रा. करमळकर यांनी सांगितले.

‘ई-कंटेन्ट पोर्टल’ची लिंक –
Http://econtent.unipune.ac.in:8080/jspui