Will make Indrayani river pollution free – MLA Mahesh Landge

just pune things app
Share this News:

पिंपरी – पिंपरी-चिंचवड आणि परिसराचे वैभव आणि वारकरी बांधवांमध्ये पवित्र म्हणून ओळखल्या जाणा-या इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात सुटका करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष आरखडा तयार करण्यात येणार आहे, त्याबाबत महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, च-होली, डुडूळगाव आदी भागातील नाले आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. तसेच मानवी मैलामिश्रित सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपत्रात सोडले जाते. परिणामी, इंद्रायणी प्रचंड प्रदूषित झाली आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आणि नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नदीची सध्यस्थिती पाहावी. त्याआधारे ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त श्रवण हार्डीकर यांनी शनिवारी महापालिका हद्दीतील इंद्रायणी नदीपात्राची पाहणी केली. यावेळी महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पर्यावरण विभागचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, शहरसह अभियंता दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय भोसले, पाणीपुरवठा विभागाचे प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.

नदीपात्रात मोठ्याप्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नदीपात्राजवळील मोठ्या सोसायटीमधील लोकांना डास, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अत्यंत प्रदूषित असलेले पाणी पुढे श्रीक्षेत्र आळंदीला जाते. याठिकाणी लाखो भाविक, वारकरी येत असतात. वारक-यांमध्ये इंद्रायणी पवित्र असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे अशा दूषित पाण्यात स्नान केले जाते. विशेष म्हणजे, आळंदी नगर परिषद इंद्रायणीतील प्रदूषित झालेले १० एमएलडी पाणी नागरिकांसाठी उपयोगात आणते. मात्र, त्या पाण्यावर योग्य प्रक्रिया होत नाही. परिणामी, आळंदीकरांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे आळंदीतील नागरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

————-

मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणार..!

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणा-या इंद्रायणी नदीमध्ये सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी थेट सोडले जाते. तसेच, विविध कारखान्यांमधून निर्माण होणारे रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळेच नदीचे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी मैलामिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. अशा ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे नदीपात्रात सोडल्या जाणा-या प्रदूषित पाण्यावर मोठ्याप्रमाणात नियंत्रण आणता येईल. त्याबाबत महापालिका स्तरावर योग्य ती कार्यवाही करुन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांनी यावेळी दिले.

————-

‘सीएसआर’मधून नदी संवर्धन…

इंद्रायणी नदीच्या दुतर्फा  पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चाकण हद्दीतील औद्योगिक कंपन्या मोठ्याप्रमाणात आहेत. या कंपन्यांची वार्षिक उलाढालही हजारो कोट्यवधी रुपयांची आहे.‘कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करावा लागतो. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा असलेल्या कंपन्यांना आपला ‘सीएसआर’ नदीच्या संवर्धनासाठी खर्ची करण्याबाबत बंधनकारक करण्यात यावे. त्याद्वारे ‘रिव्‍हर डेव्‍हलपमेंट फंड’ उभा करुन नदी संवर्धनाचे काम करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. यावर महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर म्हणाले की, याबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन महापालिका हद्दीतील कंपनींचा ‘सीएसआर’ नदी सुधार प्रकल्पासाठी वापरता यावा. यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक पाठपुरावा करण्यात येणार आहे. ‘सीएसआर’च्या माध्यमातून देहू ते आळंदी भागातील ‘रिव्‍हर डेव्‍हलपमेंट प्रोजेक्ट’ निर्माण करण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.