एआयटीच्या तांत्रिकउपक्रमांना उदंड प्रतिसाद

Share this News:


पुणेः पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) च्या इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नीकल बोर्डातर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तांत्रिक महोत्सवाला विद्यार्थीवर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला. वार्षिक सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांचा एक भाग म्हणून दिघी कॅम्पसमध्येआकृतीहा महोत्सव आयोजित करण्यात आला. आठवडाभर रंगलेला हा महोत्सव तांत्रिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी नटलेला होता. तांत्रिक आकृती हा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धात्मक उपक्रम असून यात टेक्नीकल चषकासाठी एआयटीच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली. आपल्या सहअध्यायींसह सशक्त स्पर्धा करून आपापली तांत्रिक कौशल्ये दाखवून देण्यासाठी विविध शाखांतील विद्यार्थी एकाच छताखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र आले. या महोत्सवातला प्रत्येक इव्हेंट अटीतटीच्या स्पर्धेने रंगला होता. कोड रेड आणि ब्लाईंड कोडिंग, एनएएनडी इट आणि पीसीबी डिझायनिंगसारखे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित इव्हेंट्स, कॉण्ट्राप्शन आणि ऑटोकॅडसारख्या मेकॅनिकल इव्हेंट्सपासून रोबोटिक्सपर्यंतच्या अनेक तांत्रिक इव्हेंट्समुळे या महोत्सवात विद्यार्थ्यांची कौशल्ये पणाला लागली. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन शाखेने तांत्रिक आकृती चषक जिंकला असून मेकॅनिकल शाखेचा या स्पर्धेत दुसरा क्रमां क लागला. विद्यार्थ्यांना आपली तांत्रिक कोशल्ये दाखवण्यासाठी हा महोत्सव हे एक उत्तम व्यासपीठ ठरले.

आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक महोत्सव ‘सोल्यूशन्स 2018’ हा एआयटीतर्फे आयोजित करण्यात आलेला दुसरा इव्हेंट आहे. ‘भारत – विकसनशीलतेकडून विकसित होण्याकडे’ या थीमवर हा उपक्रम आधारित होता. संगणक, माहितीतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, रोबोटिक्स, गेमिंग आणि पेपर प्रेझेंटेशन या विभागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवातील एकूण 35 इव्हेंट्समध्ये 21 प्रसिद्ध शिक्षणसंस्थांतील 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुयोग्य व सशक्त स्पर्धात्मक दृष्टिकोनासह सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी, व्हीआयआयटी आणि एमआयटीसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची लढत झाली. यातील रोबोटिक्स इव्हेंट्समध्ये सीएमई आणि एनडीएच्या स्पर्धक संघांनी सहभागी होऊन स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावला.

स्टुडंट एप्टीट्यूड ऑलिम्पियाड हा यंदा प्रथमच सादर केलेला वैशिष्ट्यपूर्ण इव्हेंट होता. यात आर अ‍ॅण्ड डीई, एपीएस खडकी, एपीएस दिघी, एपीएस पुणे आणि एपीएस खडकवासला या संस्थांतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. प्रसिद्ध व्यक्तींची विशेष व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी टीसीएस, कॉण्ट्रीव्हन्स, गेटफोरम, एड्युकॅड, मॅकडोनाल्ड्स, स्विगी, टेम्पटेज, पिक्सी कार्स, यामाहा, मारुती सुझुकी, टीआरएस, सुझिकी, ओप्पो आणि रेड्डीज् हा आघाडीच्या ब्रॅण्ड्सनी सहाय्य पुरवले.एआयटीचे संचालक, ब्रिगेडिअर (निवृत्त) अभय भट्ट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, इव्हेंटचे प्रमुख कर्मचारी डॉ. पी. बी. करंदीकर, डॉ. स्वाती कुलकर्णी आणि प्रा. एम. बी. लोणारे यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच, प्रोत्साहनामुळे हा महोत्सव यशस्वीपणे पार पडला.

जगभरात सर्वत्र सतावणार्‍या प्रदुषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी पिक्सी कार्स प्रा. लि.ने जिप्सी ही संपूर्णतः इलेक्ट्रॉनिक गाडी सादर केली. ही गाडी या महोत्सवात प्रदर्शनास ठेवण्यात आली असून महोत्सवादरम्यान प्रायोगिक चालनासाठीही ती उपलब्ध करण्यात आली. तसेच, यामाहा, मारुती आणि सुझुकी या ब्रॅण्ड्सनीही आपापली आधुनिक वाहने यावेळी सादर केली.

डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे सहसंचालक श्री. आलोक मुखर्जी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेले डीआरडीओ प्रदर्शन हा या महोत्सवातला सर्वांत महत्वाचा इव्हेंट ठरला. त्याचसोबत, महत्वाच्या ठरलेल्या आर अ‍ॅण्ड डीई प्रदर्शनात क्षेपणास्त्रे आणि रणगाड्यांसारख्या विविध शस्त्रांची मॉडेल्स सादर करण्यात आली. या मॉडेल्सच्या माध्यमातून युद्धाच्या विविध पद्धती आणि त्यांतील तांत्रिक प्रगतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांचे मनोरंजन करून त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी बाईक स्टण्ट शो आणि फायर स्टण्ट शोसारखे मजेशीर इव्हेंट्सही आयोजित करण्यात आले होते. वाचनप्रेमी आणि कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी कला व हस्तकला प्रदर्शनही भरवण्यात आले होते.