काळजी घेतल्यास खेळाडूंमधील गुडघ्याच्या दुखापती टाळणे शक्य
खेळाडू आणि दुखापती म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू, असे म्हटले जाते. कारण, खेळताना खेळाडूंना दुखापती होणे सामान्य बाब आहे आणि सतत खेळत राहिल्याने त्यांच्या सांध्यांवर, त्यातही गुडघ्यांवर, सर्वाधिक परिणाम होतो. काळानुसार आपल्या सांध्यांची झीज होणे तर सामान्य आहे. हा काही आजार नाही. वाढत्या वयासोबत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागतो. अर्थात आपल्या सांध्यांच्या समस्या आपली जीवनशैली आणि आहारावर अवलंबून असतात, तर खेळाडूंना दररोज खेळण्यासोबतच असे काही व्यायाम करावे लागतात, जे सामान्य माणसाला करावे लागत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या सांध्यांवर होतो.
दुखापती या केवळ क्रिकेटपुरत्या मर्यादित नाही. थाळीफेक खेळणाऱ्या क्रीडापटूंना खांद्यांचा वापर खूप करावा लागतो, त्यामुळे त्यांच्यात खांद्याच्या दुखापतीचा धोका अधिक असतो. अनेक मैदानी खेळ सातत्याने खेळल्यास शरीरावर त्याचे परिणाम होतात आणि त्यातही गुडघ्याला दुखापती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मग तो फुटबॉल असो, हॉकी असो, वेटलिफ्टिंग असो, टेनिस असो की बॅडमिंटन असो. बहुतेक सर्वच मैदानी खेळांमध्ये गुडघ्यांचा उपयोग सर्वात जास्त होतो. त्यातच खेळामध्ये खेळाडू एकच हालचाल वारंवार करतात त्यामुळे गुडघ्यावर खूप जास्त जोर पडतो.
याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे अस्थिविकार आणि सांधे प्रत्यारोपण शल्यविशारद (ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन) डॉ. किरण खरात सांगतात, “तुम्ही गुडघ्यावर ताण येणाऱ्या हालचाली रोज सातत्याने करत असाल, तर दुखापतीची शक्यता नाकारता येत नाही. काळजी फक्त एवढी घ्यायची की या दुखापतीकडे दुर्लक्ष करायचे नाही. जगात दरवर्षी कित्येक खेळाडूंना दुखापतीमुळे कारकीर्द अर्धवट सोडून देणे भाग पडते. यात गुडघ्यांच्या दुखापतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. कारण, शरीराचे वजन सर्वाधिक गुडघ्यावर पडते. त्यामुळे खेळाडूंनी गुडघ्याच्या दुखापतींकडे गांभीर्याने बघून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.”
सुरुवातीच्या काळात खेळाडू जोशात किंवा स्वतला सिद्ध करण्याच्या नादात दुखापतींकडे दुर्लक्ष करतात. सध्या खेळाडू होण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या खेळाडूंनी खेळ समजून घेतानाच आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. व्यावसायिक प्रशिक्षक त्यांच्या अनुभवाच्या आधारे खेळाडूंना विविध पद्धतींची मदत घेऊन दुखापती दूर ठेवण्यात मदत करू शकतात,” असेही डॉ. खरात म्हणाले.
संपूर्ण प्रत्यारोपणासारख्या आधुनिक तंत्रज्ञानात कम्प्युटरच्या मदतीने रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वीच गुडघ्याचे अलाइनमेंट केले जाते त्यामुळे शस्त्रक्रियेला वेळ कमी लागतो या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेत रुग्णाला कमी रक्तस्राव होतो आणि बरे होण्याची प्रक्रिया वेगाने होते. पर्यायाने रुग्णालयातही तुलनेने कमी काळ राहावे लागते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला नैसर्गिक गुडघे असल्यासारखेच वाटते आणि हे कृत्रिम गुडघे अनेक वर्षे चांगले राहतात. या सगळ्या फायद्यांकडे बघू असे म्हणायला हरकत नाही की हल्ली आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेची प्रक्रिया केवळ सुलभच नव्हे तर अधिक सुरक्षितही झाली आहे.
खेळाडूंना गुडघ्याच्या दुखापती दूर ठेवण्यासाठी काही दक्षता:-
•खेळणे सुरू करण्यापूर्वी खेळाचे नियम व्यवस्थित समजून घ्या.
•खेळासाठी आवश्यक उपकरणांचा वापर करूनच तो खेळ खेळा.
•खेळाची उपकरणे चांगल्या दर्जाची असावीत आणि त्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा
•खेळताना वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून खेळत राहणे काही शहाणपणाचे नाही. आपल्या प्रशिक्षकांशी त्याबद्दल बोला
•खेळ सुरू करण्यापूर्वी पूरक (वॉर्म-अप) व्यायाम करा, म्हणजे खेळायला लागल्यानंतर अचानक शरीरातील सांध्यांवर दबाव येणार नाही
•खेळ संपल्यानंतर शरीराला शांत करणारे व्यायामही करा
•आपले गुडघे जास्त वाकवू नका आणि गुडघे वळवण्याचा प्रयत्नही करू नका
•गुडघ्यांवर जास्त ताण येऊ नये यासाठी योग्य फिटिंगचे बूट वापरा
•सपाट जमिनीवरच धावा
•क्रीडापटूंनी आपल्या वजनावर ताबा ठेवणे खूप आवश्यक आहे
•आरोग्य तंदुरुस्त राखण्यासाठी पौष्टिक आहारही आवश्यक आहे
•हाडे बळकट राहावीत म्हणून जीवनसत्वे व कॅल्शिअमयुक्त आहार घ्या
•धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा
