डॉ. मनोज दुराईराज यांचा बीजेएमसीच्यावतीने डॉ. बी. बी. दीक्षित पुरस्काराने सन्मान
पुणे, २३ फेब्रुवारी २०१८ – गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये ह्रदयविकाराच्या शेकडो रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. मनोज दुराईराज यांना अलिकडेच रिसर्च सोसायटी ऑफ बीजेएमसी अॅन्ड एसजीएचच्यावतीने डॉ. बी.बी. दीक्षित ओरेशन अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या एम.जी. सभागृहामध्ये 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या 44 व्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये बी.जे. मेडिकल कॉलेजचे चीफ कार्डिओलॉजिस्ट डॉ. एन. जी. करंदीकर यांच्या हस्ते डॉ. मनोज दुराईराज यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
डॉ. मनोज दुराईराज यांनी अल्पावधीतच हृदय उपचाराच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. डॉ. मनोज दुराईराज यांनी दिल्लीच्या ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसमधून जनरल सर्जरी या विषयामधून एम.एस. ही पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. हृदय शस्त्रक्रियेसाठी देशात सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस येथे कार्डिओ थोरॅसिक सर्जरीमध्ये एससीएच करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून त्यांनी बायपास सर्जरीमधील अॅडव्हान्स्ड फेलोशीप मिळवून यशस्वीपणे पूर्ण केली. गेल्या 12 वर्षांपासून डॉ. दुराईराज अॅडल्ट अॅन्ड पेडियाट्रीक कार्डिअॅक सर्जन म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. दुराईराज यांचे हृदयशस्त्रक्रियेशी संबंधित एकूण 9 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. या कामगिरीबद्दल त्यांना गेल्यावर्षी फेलो ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी या प्रतिष्ठित सन्मानाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पुण्यातील एकमेव हार्ट सर्जन आहेत. याशिवाय नायजेरीयामध्ये बालरुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याची अवघड कामगिरीही त्यांनी करून दाखवली आहे. डॉ. मनोज दुराईराज आणि त्यांच्या सहकाऱ्यानी मिळून गेल्यावर्षी 5 मार्च रोजी पुण्यातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. तेंव्हापासून या टीमने आतापर्यंत हृदय प्रत्यारोपणाच्या 11 शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवल्या आहेत. याशिवाय येमेनमध्ये पहिल्यांदाच हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचे श्रेयही डॉ. दुराईराज यांना मिळते आहे.
बीजेएमसीच्या कॉन्फरन्समध्ये डॉ. दुराईराज यांनी पुण्यातील ह्रदय प्रत्यारोपणाच्या पहिल्या शस्त्रक्रियेचा अनुभव सांगितला. या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरु आणि आयसीसीआर,चे माजी उपाध्यक्ष एस.एन. पठाण, बीजेजीएमसी एन्ड एसजीएचचे डीन आणि पॅट्रोन डॉ. अजय चंदनवाले, रिसर्च सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दिलीप कदम आणि ४४ अनुअल कॉन्फरन्स चे ओर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. शेफाली पवार उपस्थित होते. डॉ. दुराईराज यांनी पुण्याच्या नावलौकिकामध्ये जी मोलाची भर घातली आहे, त्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते डॉ. दुराईराज यांना आऊटस्टँडिंग सिटीझन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ही त्यांच्या योगदानाची यथोचित दखल असल्याचे म्हटले आहे.
