नवीन वीजजोडणीला विलंब होत असल्यास तक्रार नोंदवा – महावितरण

Share this News:

पुणे परिमंडलमध्ये 15 उपविभागांत 24 तासांत वीजजोडणी

पुणे, दि. 17 : आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून फर्म कोटेशनची रक्कम भरली आहे, अशा ग्राहकांना नवीन वीजजोडणी मिळण्यास विलंब होत असल्यास संबंधीत वीजग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यासाठी पुणे परिमंडलस्तरावर 7875767123 व 7875767058 हे दोन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान, नवीन वीजजोडणीसाठी ग्राहकांचा अर्ज प्राप्त झाल्यापासून मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने केवळ 24 तासांत नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही पुणे परिमंडलातील 15 उपविभागांत सुरु करण्यात आली आहे. या उपविभागांसह पुणे परिमंडलाच्या इतर उपविभागांतही अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणी घरगुती किंवा वाणिज्यिक वर्गवारीतील सिंगल किंवा थ्री फेजची नवीन वीजजोडणी 24 तासांत कार्यान्वित करण्यात येत आहे.

नव्या वीजजोडणीची मागणी करताना संबंधीत ग्राहकांकडे देयकाची थकबाकी नसल्यास व फर्म कोटेशनच्या रकमेचा त्वरीत भरणा केल्यास 24 तासांत नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. यात पुणे परिमंडलातील (कंसात विभागाचे नाव) कोथरूड, डेक्कन उपविभाग (कोथरूड), शिवाजीनगर उपविभाग (शिवाजीनगर), प्राधिकरण उपविभाग (भोसरी), चिंचवड, खराळवाडी, सांगवी उपविभाग (पिंपरी), वाडिया उपविभाग (बंडगार्डन), कसबा पेठ व रास्तापेठ उपविभाग (रास्तापेठ), पेशवेपार्क व स्वारगेट उपविभाग (पर्वती), फायरब्रिगेड उपविभाग (पद्मावती) तसेच ग्रामीण भागातील लोणावळा व तळेगाव (राजगुरुनगर) या 15 उपविभागांचा (राजगुरुनगर) समावेश आहे.

सोबतच आवश्यक व योग्य कागदपत्रांची पुर्तता करून नवीन वीजजोडणीसाठी महावितरणकडून मिळालेल्या कोटेशनची रक्कम भरलेली आहे व तरीही नवीन वीजजोडणी कार्यान्वित होण्यास विलंब होत असल्यास पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना त्याबाबत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत 7875767123, 7875767058 या मोबाईल क्रमांकावर तक्रार करता येईल. प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही थेट परिमंडलस्तरावरून होणार आहे व त्याबाबत संबंधीत ग्राहकांना कळविण्यात येणार आहे.