भूजल व्यवस्थापनाला लोकसहभागाची जोड आवश्यक – शेखर गायकवाड
पणे, दि. २ जुलै :पाण्याची मागणी लोकसंख्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात पाणीटंचाईची तीव्रताहि त्याच वेगाने वाढत आहे. अशावेळी जमिनीखालील पाण्याला अर्थात भूजल व्यवस्थापनाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लोकसहभागाची जोड आवश्यक असल्याचं मत राज्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. वनराई पर्यावरण वाहिनीतर्फे आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उत्तम प्रशासक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शेखर गायकवाड सर्वाना परिचयाचे आहेतच. मात्र वनराईच्या एक दिवसीय कार्यशाळेत त्यांनी एक प्रभावी वक्ता, मार्गदर्शक आणि शिक्षकाची भूमिका अतिशय उत्तमरित्या पार पडली. कार्यशाळेतील उपस्थितांना त्यांनी अगदी सोप्या पद्धतीत भूजल, भूगर्भविज्ञान, शेतीतील अनेक पैलू समजावून सांगितले.
वनराई पर्यावरण वाहिनीतर्फे आयोजित या एक दिवशीय कार्यशाळेत अन्नराईचे निरंजन उपासनिक यांची “मिलेनियम स्कुल येथील सेंद्रिय अन्न बागेची यशोगाथा”, ज्योतीताई शहा यांचे
“टाकाऊ साहित्यापासून बाग फुलविण्याचे सोपे तंत्र”, डॉ. राहुल मराठे यांचे “बागेच्या संरक्षणासाठी मित्रकीटक” विषय मार्गदर्शन झाले. श्रीनिवास खेर आणि अशुतोष प्रधान यांनी “गुरु बाग” विषयीची संकल्पना उलगडली.
यावेळी ‘भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणे’चे संचालक श्री. शेखर गायकवाड, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती सुजाता पवार, वनराईचे मुख्य प्रकल्प संचालक श्री. जयवंत देशमुख, अमित वाडेकर, प्रकल्प संचालक श्री. प्रकाश जगताप आणि वनराईचे प्रभारी सचिव श्री. चंद्रकांत इंगुळकर, डॉ. दिलीप गरुड, अन्नराई चे निरंजन उपासनी उपस्थित होते.
