महावितरणकडून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत

Share this News:

पुणे, दि. 03 : जुन्नर व आंबेगाव तालुक्यात रविवारी (दि. 30 एप्रिल) सायंकाळी झालेल्या वादळाच्या तडाख्यात सुमारे 400 वीजखांब कोसळल्याने वीजयंत्रणा विस्कळीत झाली होती. तथापि महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांच्या अविश्रांत प्रयत्नांनी या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा तात्पुरत्या व पर्यायी व्यवस्थेतून सुरळीत झालेला आहे.

दरम्यान या जोरदार वादळामुळे महावितरणचे सुमारे 35 लाखांचे नुकसान झाले असून विस्कळीत वीजयंत्रणा पुन्हा उभारणीचे कामे युद्धपातळीवर सुरु झाले आहे. यात महावितरणचे 35 अभियंते, सुमारे 400 कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे 90 कर्मचारी सहभागी झालेले आहेत.

मंचर विभागातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यामध्ये दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास जोरदार वादळाने थैमान घातले. ताशी 100 किलोमीटर वेगाच्या या वादळामुळे झाडे व मोठ्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्या. त्यामुळे लोखंडी तसेच सिमेंटचे सुमारे 400 वीजखांब जमिनीवर कोसळले. त्यावरील उच्च व लघुदाबाच्या वाहिन्या जमीनदोस्त झाल्याने या दोन्ही तालुक्यातील 35 उपकेंद्गांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजयंत्रणा विस्कळीत झाल्याने सुमारे 2 लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची स्थिती होती. महावितरणचे मंचर विभागातील अभियंता व कर्मचार्‍यांनी लगेचच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्ती कामांना वेग दिला व त्याच दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत 14 उपकेंद्गांद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले. त्यानंतरही पहाटे चारवाजेपर्यंत वीजखांब उभे करणे, वीजवाहिन्यांची दुरुस्ती, तात्पुरत्या किंवा पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याची सोय करण्यात आली व अभियंता, कर्मचार्‍यांच्या अविश्रांत प्रयत्नातून घोडेगाव, आळेफाटा, ओतूर, नारायणगाव या शहर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी, दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आणखी चार आणि दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच 35 उपकेंद्गांतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यासोबतच टप्प्याटप्प्याने सर्व वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा सुरु झाला. सद्यस्थितीत राजुरी गाव व परिसरातील वाड्या व वस्त्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झालेला असून दुरुस्ती काम सुरु आहे. आज सायंकाळपर्यंत या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होईल. मात्र वादळाच्या तडाख्यात उच्चदाब वाहिन्यांचे 50 व लघुदाब वाहिन्यांचे 350 असे 400 वीजखांब भूईसपाट झाले आहेत. यात महावितरणचे सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी 200 वीजखांब तसेच इतर आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोबतच वीजग्राहकांच्या वैयक्तिक तक्रार निवारणाचे कामही वेगाने सुरु आहे. 

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्ग पवार व श्री. सुनील पावडे, कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मठपती, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री जयंत घेटमे, अनिल चौगुले, उमेश करपे, संतोष तळपे, विशाल नाईकनवरे आदींसह अभियंते, कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी योगदान दिले.