वीजबिल भरण्यासाठी जुन्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत
मुंबई, दि. 09 नोव्हेबर, 2016 : केंद्ग शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे वीजग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा वीजबिल भरण्यासाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. याबाबत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
भारत सरकारचे राजपत्र क्र. 2652, दि. 08 नोव्हेंबर 2016 नुसार दि. 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार महावितरणच्या राज्यभरातील वीजबिल भरणा केंद्गात जमा झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा दि. 10 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत बँकांच्या संबंधीत शाखांमध्ये जमा करण्याचे निर्देश बँकांनी महावितरणला दिलेले आहेत. या निर्देशांमुळे वीजबिल भरणा, नवीन वीजजोडणीचे कोटेशन किंवा इतर रकमेचा भरणा करण्यासाठी 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारता येणार नाही, असे महावितरणने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
याबाबत नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंती वीजग्राहकांना केली आहे. तसेच ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे.
