शहराचे ‘शांघाय’ करणार होतात त्याचे काय झाले : संजोग वाघेरे पाटील

Share this News:

पिंपरी (दि. 27 जून 2018) ‘ना भय ना भ्रष्टाचार’ अशी वल्गना करुन सत्तेवर आलेल्या भाजपाने पिंपरी चिंचवड शहराला मागील सव्वा वर्षात किती निधी दिला. मुख्यमंत्री शहरात असताना भाजपाच्याच नगरसेवकाचा भरदिवसा खून होतो. कायदा सुव्यवस्थेचे काय झाले? शहराचे ‘शांघाय’ करणार होतात त्याचे काय झाले? याचे उत्तर पिंपरी चिंचवडमधील नागरीकांना मिळाले पाहिजे. असे पत्रक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात तीस सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी एकवीस सभा तहकूब करण्याचा ‘राष्ट्रीय विक्रम’ करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणा-या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. अशीही मागणी वाघेरे पाटील यांनी केली आहे.

सर्व साधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिका-यांना ‘टक्केवारीच्या’ राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे. स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणा-या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब, माजी उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षात केंद्र व राज्य सरकारकडून शहरात अत्यावश्यक विकासप्रकल्प राबविण्यासाठी हजारों कोटींचा निधी देण्यात आला. त्यानिधीतूनच मागील काळात झालेल्या पुणे – मुंबई महामार्गावर व औंध – रावेत रस्त्यावरील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरची कामे करण्यात आली. यापैकी काही प्रकल्प राष्ट्रवादीच्या काळात नव्वद टक्के पूर्ण करण्यात आली होती. उर्वरित दहा टक्के काम करुन त्यांची उद्‌घाटने श्रेयवादावरुन थांबवून नागरिकांना वेठीस धरण्याचे व पाणी प्रश्नाचे गलिच्छ राजकारण या शहरातील नागरीकांनी कधी पाहिले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात त्रेचाळीसाव्या क्रमांकावर गच्छंती झाली आहे. अशीही टिका वाघेरे पाटील यांनी केली आहे.